तुकाई उपसा सिंचन योजनेबाबत रोहित पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याचा मांडला लेखाजोखा!
कर्जत (प्रतिनिधी) – राम शिंदे यांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून तुकाई उपसा सिंचन योजना गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्याचा आरोप केला आहे. मात्र याबाबत आमदार रोहित पवार यांनी स्पष्टीकरण देत संपूर्ण लेखाजोगाच समोर मांडला आहे. दरम्यान, तुकाई उपसा सिंचन योजनेअंतर्गत २३ पाझर तलाव पुनर्भरण व सिंचन वापरासाठी प्रस्तावित होते. या योजनेत तत्कालीन भाजप शासन काळात गायकरवाडी, खंडाळवाडी, वाघनळी, पाटेगाव खालील चांदे बुद्रुक या चार तलावांचा योजनेत समावेश न झाल्यामुळे पुनर्भरण व वापरास परवानगी मिळालेली नव्हती व तुकाई उपसा सिंचन राखीव वनातील काही क्षेत्रे संपादित होणे असल्यामुळे वनविभागाची संमती देखील प्राप्त होणे आवश्यक होते. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम शिंदे यांनी घाईगडबडीने निधी मंजूर केला, पण त्याला लागणार्या प्राथमिक परवानग्या मात्र त्यांनी घेतल्या नाहीत. जसे की वनविभागाची परवानगी घेतली नव्हती, ज्याला परवानगीसाठी जास्त वेळ लागतो. परंतु रोहित पवार यांनी कोरोनाच्या गंभीर परिस्थितीतही अनेक बैठका घेतल्या व पाठपुरावा केला आणि सर्व परवानग्या आणण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी पार पाडले, त्यानंतर काम सुरू झाले. त्यामुळे ३ वर्षे काम बंद पाडले हा राम शिंदे यांचा आरोप पूर्णपणे खोटा आहे, असे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
रोहित पवार यांनी आमदार झाल्यानंतर पहिल्याच डिसेंबर-१९ च्या हिवाळी अधिवेशनात तत्कालीन मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना पत्राद्वारे तुकाई उपसा सिंचन योजनेचे काम जलद गतीने होण्यासाठी अधिवेशन काळात बैठक आयोजित करण्याबाबत विनंती केली व मंत्री महोदयांनी देखील तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत, संबंधित अधिकार्यांची बैठक बोलवून चारही गावातील तलावांचे समावेश करण्याबाबतचे आदेश दिले होते. या अनुषंगाने प्रादेशिक जलसंधारण अधिकारी मृदा व जलसंधारण विभाग, नाशिक यांच्यामार्फत प्रस्ताव सादर करण्यात आला. या योजनेचा आमदार रोहित पवार यांनी सतत पाठपुरावा व पत्रव्यवहार केला. त्यानंतर तुकाई सिंचन योजनेच्या कामास ३ कोटी ५५ लाख २१ हजार रुपये इतका आवश्यक असणारा निधी देखील वितरित करण्यात आला होता व खर्या अर्थाने कामाला गती मिळाली. तसेच तुकाई सिंचन योजनेच्या भूसंपादनासाठी व संपादित जमिनीचा मोबदला देण्यासाठी देखील वारंवार आमदार रोहित पवार यांनी शासनाकडे पाठपुरावा केला व नुकताच ऑक्टोबर २०२२ मध्ये मौजे शिंदे येथील संपादित जमिनीचा ३१ लाख रुपये मोबदला हा वितरित देखील करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या कोणतेही काम मंजूर करून आणू शकत नसलेल्या राम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून गेल्या ३ वर्षांपासून निधी अभावी तुकाई उपसा सिंचन योजनेचे काम बंद असल्याचा केलेला आरोप हा धादांत खोटा असल्याचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात विविध विकास कामे जलद गतीने मार्गी लावण्यासाठी व मंजूर कामे पूर्णत्वास नेण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न केला. कर्जत-जामखेड मतदारसंघातील विकास कामांकरिता मोठ्या प्रमाणात निधी खेचूनदेखील आणला. मविआ काळात कामे रद्द करण्याचे व रखडवण्याचे घाणेरडे राजकारण कधीच केले नाही. राम शिंदे सवयीप्रमाणे खोटं बोलण्यात पारंगत आहेत. त्यांच्याबद्दल फार बोलायचं नाही पण कोणीही खोट्या गोष्टी लोकांमध्ये पसरवत असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही!
– आमदार रोहित पवार, (कर्जत जामखेड विधानसभा)