Breaking newsHead linesMaharashtraMetro CityMumbaiPolitics

केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाआघाडीच्या आमदारांना फोन!

– विधानपरिषद निवडणूक : १० जागांसाठी २० जूनला निवडणूक
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – विधानपरिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जूनला निवडणूक होत असताना, या निवडणुकीसाठी भाजपने सर्व राजकीय हत्यारे वापरण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. त्यातच, केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाआघाडीच्या आमदारांना फोन येत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाने राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तर भाजपने हा आरोप फेटाळून लावला आहे.
नाना पटोले यांच्या आरोपानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नाना पटोलेंचे विधान म्हणजे, २० तारखेला लागलेल्या निकालाचे लक्षण असल्याचं त्यांनी सांगितले. २० तारखेला काँग्रेसची एक जागा हरल्यानंतर जी कारणं द्यावी लागतात, त्याची स्क्रीप्ट नाना पटोले आताच तयार करत आहेत,’ असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर गंभीर आरोप केले आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांना फोन येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबतचे फोन रेकॉर्डींग आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना पटोले म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीच्या काही आमदारांना फोन करत आहेत. ते फोन कसे करत आहेत, याचे रेकॉर्डींग आमच्याकडे आहे. योग्य वेळी आम्ही हे रेकॉर्डींग दाखवू. केंद्रीय तपास यंत्रणांकडून फोन करून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण अशा दबावाला कुणी घाबरणार नाही, असेही पटोले म्हणाले.

राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी सरकारला धोबीपछाड दिला होता. पुरेसे संख्याबळ असतानाही महाआघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीवरून दोन्ही बाजुंनी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. २० जूनरोजी १० जागांवर विधान परिषदेची निवडणूक होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!