ChikhaliVidharbha

पाणी मागणी अर्ज भरा, ‘खडकपूर्णा’तील हक्काचे पाणी राखीव ठेवा!

– वेळीच पाणी मागितले नाही तर, मराठवाड्यात पळविले जाईल!

मिसाळवाडी, ता. चिखली (गजानन मिसाळ) – चिखली तालुक्यातील महत्वपूर्ण प्रकल्प असलेला खडकपूर्णा प्रकल्प यंदा पूर्णक्षमतेने भरला असून, या प्रकल्पावरील उपसा जलसिंचन योजना टप्पा क्रमांक एक ते चारवरील सर्व पाणी वापर संस्था व या संस्थांचे लाभधारक शेतकरी, पदाधिकारी यांनी आपल्या हक्काचे पाणी मिळविण्यासाठी पाणी मागणी अर्ज प्रकल्प अधिकार्‍यांकडे भरावेत. सात दिवसांच्याआत असे अर्ज सादर करावेत, म्हणजे २५ ते ३० नोव्हेंबरपर्यंत पाणी मिळेल. आपल्या हक्काचे पाणी मिळविण्यासाठी कसूर करू नका, असे आवाहन ज्येष्ठ नेते तथा शिक्षणमहर्षी शेनफडराव घुबे यांनी केले आहे.

याबाबत त्यांनी सविस्तर आवाहनच पाणी वापर संस्था व लाभधारक शेतकर्‍यांना केले आहे. ते नमूद करतात, की यावर्षी खडकपूर्णा प्रकल्प आपल्या सर्वांच्या नशिबाने पूर्ण क्षमतेने भरला असून, आपापल्या पाणी वापर संस्थेचे पाणी त्यात राखीव आहे. सदर पाणी आपल्या हक्काचे असून, ज्याप्रमाणे आपल्या बँकेच्या खात्यात आपण पैसे डिपॉझिट ठेवतो व गरजेनुसार कधीही विड्रॉल भरुन काढू शकतो, अगदी त्याचप्रमाणे आपले हक्काचे पाणी रब्बी हंगामात व गरज पडल्यास खरिप हंगामात किंवा टंचाईचे प्रसंगी उन्हाळ्यातसुद्धा आपण वापरु शकतो. बँकेतून पैसे काढण्यासाठी ज्या प्रमाणे विड्रॉल भरावा लागतो, त्याप्रमाणे पाणी मागणी अर्ज प्रकल्प अधिकार्‍यांकडे सादर करुन पाणी मागणी नोंदवावी लागते,व त्यानंतर पाणी कधी सोडायचे, किती सोडायचे याबाबतचे नियोजन पकल्प अधिकार्‍यांना करावे लागते. आज अर्ज भरले म्हणजे उद्याच पाणी मिळते, असे होऊ शकत नाही. कारण आपले सर्व पाणी हे लिफ्ट इरिगेशनचे असल्यामुळे व त्यावरील सर्व यंत्रसामुग्री अत्यंत खर्चिक असल्यामुळें आर्थिक नियोजनसुद्धा त्यांना करावे लागते. पाणी वापर संस्थेच्या लाभक्षेत्रात एकूण सिंचन क्षेत्राच्या किमान पन्नास टक्यांपेक्षा जास्त सिंचन क्षेत्रासाठी पाणी मागणी नोंदविली जावी, असा सर्वसाधारणपणे नियम आहे. त्यापेक्षा कमी क्षेत्राची पाणी मागणी नोंदविल्यास यंत्रणेवर होणारा खर्च परवडत नसल्यामुळे पाणी न सोडण्याबाबतदेखील निर्णय घेतला जावू शकतो. लिफ्ट वरील सिंचनासाठी सोडल्या जाणार्‍या पाण्यासाठीचा पाणीपट्टी कर हा चौथ्या टप्यासाठी हेक्टरी फक्त पंचविसशे रुपये तर तिसर्‍या टप्प्यासाठी बावीसशे रुपये म्हणजे फक्त एक क्विंटल गव्हाची दाम ईाका आहे. एक हेक्टर क्षेत्रामधे किमान ३० क्विंटल गव्हाचे उत्पन्न मिळते हे आपणा सर्वांना माहीत आहे.

त्यामुळे पाणीपट्टी कर हा नाममात्र आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. माझी तर लाभ क्षेत्रातील शेतकर्‍यांना अशी विनंती राहील की, लाभक्षेत्रातील सर्व शेतकर्‍यांनी (एक हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असणार्‍या शेतकर्‍यांना वगळून) ज्या शेतकर्‍याकडे एक हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे, अशा सर्व शेतकर्‍यांनी सरसकट एक हेक्टर किंवा आपल्या सिंचन क्षमतेनुसार जास्त क्षेत्राची मागणी नोंदवून पाणी वापर संस्थेअंतर्गत राखीव असलेले सर्व पाणी राखून ठेवावे. म्हणजे, आपले हक्काचे पाणी प्रकल्पामधे राखीव राहील. आपण जर आपली पाणी मागणी नोंदविली नाही तर आपले पाणी इतर उद्योगासाठी विकले जाऊ शकते, किंवा मराठवाड्यात पळविले जाऊ शकते.

एकदा का पाणी पळविले गेले तर ब्रम्हदेवसुद्धा आपल्याला पाणी मिळवून देऊ शकत नाही. फक्त भारत बोंद्रे नावाच्या एका महान भगिरथाने ही उलटी गंगा आणून, तुमच्या दारात आणून सोडलेली आहे, हे आपले सर्वांचे भाग्य आहे. परंतु, आपण जर माझ्या वरील म्हणण्याकडे कानाडोळा केला तर आयुष्यभर पश्चातापाशिवाय दुसरे काहीही उरणार नाही, व आपली पुढील पिढी आपणास कदापिही माफ करणार नाही, याची खूणगाठ बांधून ठेवावी. प्रकल्पाचा कोणताही अधिकारी तुम्हाला हे सांगण्यासाठी तुमच्या घरी येणार नाही. कारण त्यांचे पगार चालू आहेत व चालू राहणार आहेत, व त्यांना तुमच्याशी काहीही देणेघेणे नाही. त्यासाठी आपणास पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की, कृपया ज्या शेतकर्‍यांना मागील वर्षी जे पाणी वापरले, त्या पाण्याची पाणीपट्टी आपापल्या पाणी वापर संस्थेकडे भरणा करुन रितसर पावती घ्यावी, व या वर्षीची पाणी मागणी पाणी वापर संस्थेच्या मार्फत अर्जाद्वारे प्रकल्प अधिकार्‍यांकडे सात दिवसाचेआत नोंदवावी, म्हणजे २५ ते ३० नोव्हेंबरपर्यंत आपणास पाणी मिळू शकेल, अशी सूचनाही शेनफडराव घुबे यांनी आपल्या आवाहनाद्वारे केली आहे.


अंचरवाडी वितरिका अंतर्गत येणार्‍या पाणी वापर संस्था

१) बळीराजा पाणी वापर संस्था भरोसा अध्यक्ष- एकनाथ थुट्टे
२) जय मल्हार पाणी वापर संस्था पिंपळवाडी, अध्यक्ष- नामदेव गालट, सचिव- मधुकर घुबे
३) रामनाथ महाराज पाणी वापर संस्था, मिसाळवाडी, अध्यक्ष- कृष्णा सुभाष मिसाळ
४) छत्रपती शिवाजी महाराज जनपूर्ती पाणी वापर संस्था, शेळगाव आटोळ, अध्यक्ष- संतोष आटोळे
५) शनेश्वर पाणी वापर संस्था, डोड्रा


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!