Head linesMaharashtraMetro CityPolitical NewsPoliticsWorld update

महाराष्ट्राचे उद्योग राज्याबाहेर नेऊन मोदींनी तरुणांचे रोजगार, नोक-या हिरावल्या! : राहुल गांधी

खरा हिंदुस्थान समजून घ्यायचा असेल तर रस्त्यावरून चालले पाहिजे हवेतून नाही

नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये गेले, एअरबसचा प्रकल्पही असाच गुजरातमध्ये अचानक गेला. कसा गेला? हे कोणालाही कळले नाही. वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्पही गेला. लाखो कोटी रुपयांची गुंतवणुकही गेली व महाराष्ट्रातील तरुणांचे रोजगारही नरेंद्र मोदींनी हिरावून घेतले आहेत, असा घणाघाती हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला. नांदेड जिल्ह्यातील कृष्णूर एमआयडीसी येथील आजच्या दिवसातील भारत जोडो पदयात्रेच्या संध्याकाळच्या कॉर्नर सभेत ते बोलत होते.  यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल,  प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,  माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,  खा. रजनी पाटील,  माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, मा. खा. संजय निरुपम, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आदी उपस्थित होते.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, दोन महिन्यापूर्वी ही पदयात्रा सुरू केली आणि आज महाराष्ट्रात आली आहे. उन्हा-तान्हात तुम्ही मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झालात, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. दिवसभर 7-8 तास दररोज चालतो. शेतकरी, तरुण, महिला, यांच्या समस्या ऐकून घेतो. मला यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते. रस्त्यावरून चालणे व गाडीतून चालणे यात फरक आहे. हिंदुस्थान समजून घ्यायचा असेल तर रस्त्यावर चालले पाहिजे. रस्ते कसे आहेत ते आधी कळते, राज्याची अवस्था रस्त्यावरून कळते. शेतकरी, तरुण, यांच्याकडून ऐकतो तेव्हा वाईट वाटते. 6 वर्षापूर्वी नोटबंदी केली त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. नोटाबंदी व जीएसटीने देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्सुनामी आली. देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी केली. सरकारी उद्योग खाजगी उद्योगपतींना विकले जात आहेत. सरकारी नोक-या नाहीत. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. पट्रोल, डिझेल, सिलिंडर गॅस महाग झाले. एकीकडे महागाई तर दुसरीकडे बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. जनतेचा आवाज मोदी सरकार ऐकत नाहीत. संसदेत बोलण्यास सुरू केले की लगेच माईक बंद केला जातो. देशातील तरुण लष्करात भरती होऊन देशसेवा करू पहात आहे पण नरेंद्र मोदींनी त्यावर पाणी फेरले आहे फक्त चार वर्षेच सेवा करा आणि घरी बसा अशी व्यवस्था करून ठेवली आहे.

कोणालाही घाबरू नका, मनातील भिती काढून टाका. जो ही भिती घालवेल तो द्वेष पसरवू शकत नाही म्हणून मनातून भिती काढून टाका असे आवाहन राहुल गांधी यांनी केले. मुलगा व मुलगी यांच्यात भेदभाव करू नका, मुलींना समान वागणूक दिली पाहिजे. जो समाज, देश मुलींचा सन्मान कलत पाहो तो देश प्रगती करू शकत नाही त्यासाठी मुलागा मुलगी भेदभाव न करण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी यावेळी केले.


भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात अभूतपूर्व प्रतिसाद

राहुलजींच्या स्वागतासाठी पहाटेपासूनच हजारो लोक रस्त्यांच्या दुतर्फा उभे

पदयात्रेत ‘जातपात का बंधन तोडो, भारत जोडो, भारत जोडो’, घोषणांचा जयघोष

ऐतिहासिक पदयात्रेच्या मार्गावर अबालवृद्धांची प्रचंड गर्दी

नांदेड : सूर्य अजून उगवायचा होता, अंधुकसा संधिप्रकाश होता आणि गुलाबी थंडीने वातावरण ताजतवान केलं होतं. शिरस्त्यानुसार बुधवारीही उगवत्या सूर्याच्या साक्षीने हजारो पाऊले राहुलजी गांधींच्या मागे आणि पुढे कित्येक किलोमीटर पदयात्रेत चालत होती. सकाळी सहा वाजता पदयात्रा शंकरनगरहून नायगावच्या दिशेने निघाली. पुढे बँडपथक, मागोमाग पदयात्रा…!  रस्त्याच्या दोन्ही बाजूला गावांच्या वेशीला, नाक्यांवर, चौका-चौकात कुटुंबेच्या कुटुंबे, शाळकरी मुले, तरुण आणि वयोवृद्ध लोकही यात्रेच्या स्वागतासाठी उभे होते. गावागावातून क्षणाक्षणाला पदयात्रेत लोक सामील होत होते. सूर्य जसजसा वर येईल तसा यात्रेचा आकार वाढत होता. सात वाजेपर्यंत राहुलजींच्या मागे २ किलोमीटर आणि पुढे किमान ३ किलोमीटर माणसांची डोकी, सफेद सदरे दिसत होते.

साठी गाठलेल्या कमलाबाई आपल्या सुना-नातवंडांसह देगलूर-नांदेड मार्गाला लागून असलेल्या किनाळा (ता. नायगाव) या छोट्याशा गावाच्या मुख्य रस्त्याच्या कडेला पहाटे दीड-दोन तास उभ्या होत्या. ‘राहुल गांधी माझ्या मुलासारखा….त्यांना बघायला साडेपाच वाजल्यापासून आलोय,” असे त्या सांगत होत्या. त्यांच्या आजूबाजूला गावातील २५-३० महिला, मुलेही त्याच आकांक्षेने उभी होती. आज ते सर्वजण चार वाजताच उठून पदयात्रा पाहण्यासाठी, स्वागतासाठी आल्या होत्या. त्या रस्त्यावरून ६ वाजून २० मिनिटांनी पदयात्रा आली आणि कमलबाईंची इच्छा पूर्ण झाली. यात्रा जवळ येताच अशीच इच्छा असणारे हजारो हात अभिवादनासाठी उंचावत होते, ऊर्जा देत होते. राहुलजींच्या सुरक्षा कड्याबाहेर कोणा साधूंचा एक समूह बरोबरीने चालत होता. आठ-दहा वारकरी भजन करत होते, कोणी फुले घेऊन, कोणी झेंडे उंचवत, कोणी महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा उंचावत, मुलींचे लेझीम पथक, कुठे पारंपरिक पोशाख, तर कुठे देशाची विविधतेतून एकता दर्शवणारी विविध रंगी वेशभूषा…असे अनेक रंग सोबत घेऊन पदयात्रा निघाली होती. “जातपात का बंधन तोडो…- भारत जोडो, भारत जोडो,” “वंदे मातरम”… अशा घोषणांनी वातावरण उत्साहाने भरून गेले होते. उत्साहाची ऊर्जा प्रत्येकाच्या चालण्या-बोलण्यातून, घोषणातून, कृतीतून जाणवत होती, ही ऊर्जा पुढे पुढे वेगाने वाहत होती.

नांदगावच्या शारजाबाई हनुमंत भद्रे वयाच्या पन्नाशीत यात्रेत पुढे होत्या, त्यांच्या सोबत ४० महिला आल्या होत्या. पहाटे लवकर उठून पाच वाजता आठ किलोमीटर अंतर कापून त्या शंकरनगरला आल्या होत्या. नायगावला मुस्लिम महिला मुलांसह मोठ्या संख्येने रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या होत्या. नरसी येथे लिटल स्टेप ज्ञानवर्धिनी शाळेच्या लहानग्या मुली एनसीसी गणवेशात स्वागतासाठी उभ्या होत्या, तर परभणीच्या पिंगळा येथील वारकरी शिक्षण संस्थेची मुले वारकऱ्यांच्या वेशभूषेत उभी होती.एका स्टेजवर गांधीजी, चाचा नेहरू, इंदिराजी यांच्या वेशभूषेत मुले होती, तर पुढे कथक नृत्यांगना सलामी देत होत्या. एका ठिकाणी स्वर्गीय राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली जात होती. विविध प्रकारे सामान्य जनता आपली भावना व्यक्त करत होती, आपण एक आहोत हेच ते राहुलजी गांधींना सांगत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!