Breaking newsHead linesMaharashtraMumbaiPolitics

राज्याचे नेतृत्व फडणवीसांच्या हाती, संजय राऊत यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना टोला!

– ‘मातोश्री’वर संजय राऊत यांचे जोरदार स्वागत, आदित्य ठाकरेंनी मारली कडकडाडून मिठी!

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – तब्बल १०२ दिवसांनंतर कारागृहातून सुटल्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच चालवत आहेत. लवकरच त्यांची भेट घेणार, असा टोला राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला. तसेच, राज्यातील सरकार बेकायदेशीर असल्याबद्दल आपल्या मनात तीळमात्र शंका नसल्याचेदेखील खा. राऊत यांनी सांगितले. त्याचवेळी त्यांनी फडणवीस यांनी घेतलेले काही निर्णय योग्य असल्याचे सांगत, फडणवीसांचे कौतुक केले.

कारागृहातून सुटल्यानंतर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी मातोश्रीवर जात, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी राऊत यांना मिठी मारत त्यांचे स्वागत केले. तत्पूर्वी, प्रसारमाध्यमांशी बोलताना खा. राऊत म्हणाले, की ‘राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी काही निर्णय चांगले घेतले आहेत. मी विरोधाला विरोध करणार नाही. गरिबांना घरे देण्याचा प्रयत्न, म्हाडाला अधिकार देण्याचा निर्णय मला चांगला वाटला. चांगल्या निर्णयांचे स्वागत केले पाहिजे,’ असे राऊत म्हणाले.

तुरूंगातून जामिनावर सुटका झाल्यानंतर संजय राऊत ‘मातोश्री’वर ठाकरे कुटुंबीयांच्या भेटीसाठी दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे स्वत: उपस्थित होते. संजय राऊत मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांचे कडकडून मिठी मारत स्वागत केले. मातोश्रीच्या प्रवेशद्वाराच्या कदाचित पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील सदस्याने आपल्या पक्षातील नेत्याचे स्वागत केले असावे. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणातील कटुता कमी झाली पाहीजे, या फडणवीसांच्या वक्तव्याचे मी स्वागत करतो. महाराष्ट्रात सर्वच नेते एकमेकांशी सातत्याने भेट घेत असतात. मीदेखील देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचीही लवकरच भेट घेणार आहे. माझी सुटका झाल्याने देशाच्या न्यायव्यस्थेवरील आपला विश्वासही वाढला असल्याचे राऊत म्हणाले.


दरम्यान, संजय राऊतांनी कटुतेसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सूचक प्रतिक्रिया दिली. तसेच, अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केल्याचं बोललं जात आहे. “मला जर राऊतांनी भेट मागितली तर मी देईन. मी सगळ्यांनाच भेट देतो. पण राजकारणातली कटुता दूर करायची असेल, तर सगळ्यांना मिळून ठरवावं लागेल. कुठलाही एक पक्ष हे करू शकत नाही. नेत्यांनी शांत राहायचं आणि इतरांना बोलायला लावायचं ही पद्धतही बंद करावी लागेल”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!