Breaking newsHead linesMaharashtraMumbaiPoliticsWorld update

शिवसेनेची दिवाळीनंतर पुन्हा दिवाळी! संजय राऊतांची अटक बेकायदेशीर; पीएमएलए कोर्टाने ईडीचे ‘थोबाड फोडले’!

– तब्बल १०२ दिवसानंतर बाळासाहेबांच्या सच्च्या शिवसैनिकाची जामिनावर सुटका

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – अखेर सत्याचा उशिरा का होईना विजय झाला आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे शिवसैनिक तथा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची ईडी (अमलबजावणी संचलनालय)ने केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याची जोरदार चपराक पीएमएलएल (प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग अ‍ॅक्ट) न्यायालयाने ईडीला लगावली आहे. तसेच संजय राऊत यांना सशर्त जामीन मंजूर केला. कानाखाली असा जोरदार जाळ निघाल्यानंतरही ईडीने राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. तेथे उच्च न्यायालयानेही ईडीच्या नापाक मनसुब्यावर पाणी फेरले, व उलट ईडीलाच फटकारून काढले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला चांगलेच झापले. संजय राऊतांची अटक बेकायदेशीर आहे. राऊतांना कोणतेही कारण नसताना अटक केली. त्यांना १०० दिवस जेलमध्ये ठेवले. याप्रकरणी पीएमएल कोर्टात अनेक सुनावणी पार पडल्या. दोन्ही बाजूंच्या अनेक युक्तिवादानंतर पीएमएलए कोर्टाने राऊतांना जामीन मंजूर केला. त्यामुळे तुमच्या लगोलग अपील करण्याने आम्ही काही क्षणांत राऊतांचा जामीन फेटाळणार नाही, त्यामुळे दोन्ही आरोपींची अटक कायदेशीर होती हे पटवून द्या, असे सांगतानाच मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी उद्या सुनावणी ठेवली आहे. उच्च न्यायालयानेही ईडीला दणका दिल्यानंतर, तब्बल १०२ दिवसांच्या नाहक जेलनंतर ज्येष्ठ पत्रकार, संपादक तथा खासदार, शिवसेनानेते संजय राऊत हे आज सायंकाळी ७ वाजता आर्थर रोड कारागृहातून बाहेर आले. ते बाहेर येताच शिवसैनिकांनी जोरदार जल्लोष केला. शिवसैनिकांनी दिवाळीनंतर पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली. परंतु, तब्येत बरी नसल्याने खा. राऊत यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन नंतर रुग्णालयात दाखल झाले.

संजय राऊत यांना जामीन मिळाला असला तरी, पीएमएलए कोर्टाच्या ऑर्डर कॉपीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रविण आणि संजय राऊत यांना अवैध पद्धतीने अटक करण्यात आल्याचा उल्लेख कोर्टाने आपल्या आदेशात केला आहे. त्यामुळे ईडीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हा जामीन मंजूर करताना कोर्टाने ईडीला अक्षरशः फटकारून काढले. संजय राऊत आणि प्रविण राऊत यांची अटक बेकायदेशीर आहे. तसेच ईडीने आपल्या मर्जीतील आरोपी निवडले. मुख्य आरोपी असलेल्या राकेश सारंग, एचडीआयएल, म्हाडा आणि सरकारी अधिकार्‍यांना ईडीने अटक केली नाही. ईडीने आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असल्याचेही परखड मतही न्यायालयाने मांडले आहे. पीएमएलए कोर्टाने आपल्या १२२ पानी आदेशात ईडीच्या तपासावर अनेक प्रश्न उपस्थित केले. कोर्टाने अतिशय महत्त्वाची निरीक्षण नोंदवली आहेत. कोर्टाने म्हटले की, दिवाणी खटले हे मनी लाँड्रिंग किंवा आर्थिक गुन्हे अशा नावाखाली आणून निर्दोष लोकांना त्यात ओढून आणि अटक करून अशा परिस्थितीत आणणे हे न्यायालय मान्य करू शकत नाही. प्रवीण राऊत यांना फक्त दिवाणी खटल्यात अटक करण्यात आली, तर संजय राऊत यांना काहीही कारण नसताना अटक केली गेली असल्याची महत्त्वाची टिप्पणी विशेष कोर्टाने केली. या प्रकरणात राकेश आणि सारंग वाधवान मुख्य आरोपी असताना त्यांना अटक करण्याऐवजी संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली. यात ईडीने आरोपी स्वत: च निवडले असल्याचे दिसत असल्याचे कोर्टाने म्हणत ईडीच्या तपासावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. कोर्टाने इड़ी आणि म्हाडाचे म्हणणे मान्य केले तर मर्जीने आरोपी निवडण्याच्या पद्धतीला मान्यता दिल्यासारखे होईल. त्याच्या परिणामी सामान्य लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल, असेही कोर्टाने म्हटले. पीएमएलए विशेष कोर्टाने ईडीवर कडक शब्दात ताशेरे ओढल्याने पत्राचाळ घोटाळ्यातील तपासावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. संजय राऊत यांनीदेखील या प्रकरणात आपल्याला गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला होता.

“समोर आलेली कागदपत्र आणि न्यायालयासमोर झालेल्या सविस्तर चर्चेतून हे स्पष्ट झालं आहे की प्रवीण राऊत यांना फक्त दिवाणी वादासाठी अटक करण्यात आली आहे. संजय राऊतांना तर कोणत्याही कारणाशिवाय अटक करण्यात आली आहे. हे सत्य स्पष्टपणे समोर आलं आहे”, असं न्यायालयानं नमूद केलं आहे. “दिवाणी प्रकरणातील वादाला आर्थिक गैरव्यवहार किंवा आर्थिक गुन्ह्याचं लेबल लावल्यामुळे एखाद्या निर्दोष व्यक्तीला अटक करता येणार नाही. समोर कोण आहे, त्याचा विचार न करता न्यायालयाला जे योग्य आहे, तेच करावं लागेल”, असं न्यायालयानं आदेशात म्हटलं आहे.


‘पीएमएलए’ कोर्टाने काय म्हटले?

– संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांची अटक बेकायदेशीर आहे.
– संजय राऊत यांना विनाकारण अटक झाली. प्रवीण राऊत यांच्यावर फार तर दिवाणी दावा होऊ शकेल.
– निव्वळ दिवाळी दावा असलेल्या प्रकरणाला मनी लाँडरिंग किंवा आर्थिक गुन्ह्याचे रूप देऊन एखाद्या निष्पाप माणसाची अशी अवस्था केली जाऊ शकत नाही.
– समोर कोण आहे याची पर्वा न करता कोर्टाला काय बरोबर आणि काय चूक हे बघावेच लागेल.
– संपूर्ण प्रकरणात म्हाडाची भूमिका सुरुवातीपासून संशयास्पद आहे. ईडीनेही त्यांच्या तक्रारीत मान्य केले आहे. मात्र, तरी देखील म्हाडाच्या एकाही अधिकार्‍याला या प्रकरणात आरोपी करण्यात आलेले नाही. म्हाडाने स्वतः या प्रकरणात तक्रार दाखल करून न्यायालयाच्या डोळ्यात धूळ फेक करू शकत नाही.
– राकेश वाधवान आणि सारंग वाधवान हे मुख्य आरोपी आहेत. मात्र, ईडीने त्यांना अटक न करता मोकाट सोडले आहे. विशेष म्हणजे संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना अटक केली. ईडीची ही मनमानी असून कुणालाही उचला आणि अटक करा, असे वागणे झाले.
कुणालाही उचला आणि आत घाला हे म्हाडा आणि ईडीचे वागणे आम्ही स्वीकारले, तर लोकांचा कोर्टावरचा विश्वास उडेल. लोक कोर्टाला न्यायाचे मंदिर मानतात. त्यांचा हा विश्वास उडायला नको.


पीएमएलए कोर्टात तोंडावर आपटलेल्या ईडीने संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली व पीएमएलए कोर्टाच्या आदेशाला स्थगिती द्या, अशी मागणी केली. तेथे उच्च न्यायालयाने ईडीला पुन्हा फटकारून काढले. न्यायमूर्ती भारती डोंगरे यांनी ईडीला तातडीने जामीन रद्द करण्यास नकार देत, सत्र न्यायालयाने निर्णय घेण्यास एक महिना वेळ घेतला आहे. आणि तुम्ही आमच्याकडून एका दिवसात निकाल देण्याची अपेक्षा ठेवत आहात.  संजय राऊतांना कोणतेही कारण नसताना अटक केली. त्यांना १०० दिवस जेलमध्ये ठेवले, याप्रकरणी पीएमएल कोर्टात अनेक सुनावणी पार पडल्या. दोन्ही बाजूंच्या अनेक युक्तिवादानंतर पीएमएलए कोर्टाने राऊतांना जामीन मंजूर केला. त्यामुळे तुमच्या लगोलग अपील करण्याने आम्ही काही क्षणांत राऊतांचा जामीन फेटाळणार नाही, त्यामुळे दोन्ही आरोपींची अटक कायदेशीर होती हे पटवून द्या, असे सांगतानाच, न्यायमूर्ती डोंगरे यांनी ईडीची मागणी स्वीकारण्यास नकार देतानाच जामिनाला स्थगिती देण्यास नकार दर्शवला. पीएमएलए कोर्टाची निरीक्षणे कशा प्रकारे अयोग्य आहेत हे पटवून द्या, त्यानंतर आम्हाला जर तुमचा युक्तिवाद पटला तर आम्ही आरोपीला ताब्यात घेण्याचा आदेश देऊ शकतो. पण तूर्तास त्यांच्या जामिनाला कोणत्याही प्रकारे फेटाळू शकत नाही, असे स्पष्ट शब्दात सांगत न्यायमूर्ती डोंगरे यांनी ईडीला उच्च न्यायालयातही तोंडघशी पाडले. याप्रकरणी आता उद्या सुनावणी होणार आहे.


वाधवान मोकाट, पण राऊतांना अटक!
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी मोकाट असताना राऊतांना अटक करून ईडीने विशिष्ट लोकांनाच अटक करण्याचे धोरण दाखवले, असे पीएमएलए कोर्टाने नमूद केले. ‘राकेश आणि सारंग वाधवान या संपूर्ण प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. मात्र, त्यांना ईडीने अटक केलेली नाही. ते मोकळे फिरत आहेत. मात्र, त्याचवेळी ईडीने संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना अटक केली आहे. यातून ठराविक लोकांनाच अटक करण्याची ईडीची वृत्तीच दिसून येते. जर न्यायालयाने ईडी आणि म्हाडाचे दावे स्वीकारले, तर ईडीच्या या वृत्तीवर शिक्कामोर्तब केल्यासारखे होईल. सामान्य, प्रामाणिक आणि निर्दोष लोकांचा न्यायालयावरचा विश्वास उडेल’, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
———————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!