जालना (जिल्हा प्रतिनिधी) – येथील गीताई स्टिल कंपनीत भयंकर स्फोट होऊन 7 मजूर ठार झाल्याची भीषण घटना घडली असून, चार मजूर होरपळले गेल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती हाती आली आहे. कंपनीतील लोखंड वितळणार्या भट्टीत हा स्फोट झाला असून, स्फोट एवढा भयंकर होता की, सात मजुरांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये आठ ते दहा कामगारांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर अनेक कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या दुर्घटनेतील जखमी कामगारांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या स्फोटात गीताई कारखान्याचेही मोठे नुकसान झाले असून, जखमींना औरंगाबाद शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. स्फोटाची क्षमता एवढी होती की, ज्यात भट्टी पूर्णपणे उध्वस्त झाली. त्यामुळे आजूबाजूला काम करणार्या कर्मचार्यांच्या अंगावर हा वितळलेले लोखंड पडले. ज्यात ते गंभीर जखमी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, जखमी चौघांची देखील प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. या दुर्घटनेत एकूण सात कामगार जखमी झाले आहे. दरम्यान, या घटनेतील जखमी आणि मृत्यांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
जालना औद्योगिक वसाहतीतील स्टील कंपनीत कंपनीकडून कामगारांच्या सुरक्षतेची कुठलीही काळजी घेतली जात नसल्याने गेल्या काही दिवसांपासून अनेक भीषण स्फोट घडत आहेत. यात अनेक कामगार मृत्युमुखी पडले आहेत. तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकवेळा कारवाईची मागणी केली.