– स्मशानभूमीसाठी आलेला पैसा कुणी खाल्ला? : ग्रामस्थांचा संतप्त सवाल
सिंदखेडराजा/चिखली (एकनाथ माळेकर) – सिंदखेडराजा तालुक्यातील दरेगाव येथील स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर बनला असून, या स्मशानभूमीसाठी आलेला पैसा कुणी खाल्ला? असा संतप्त सवाल निर्माण झाला आहे. गावात अंत्यविधीची सोयच नसल्याने दुर्देवाने घरासमोर अंत्यविधी करण्याची वेळ भर पावसाळ्यात बंगाळे कुटुंबीयांवर आली होती. माजी पालकमंत्री व आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मतदारसंघातील या गावात गावकर्यांसाठी स्मशानभूमी नसणे, ही लाच्छनांस्पद बाब आहे. तरी या गावात तातडीने सुसज्ज स्मशानभूमी उभारावी व यापूर्वी आलेला निधी कुणी हडप केला, त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
सविस्तर असे, की सिंदखेडराजा तालुक्यातील दरेगाव येथील स्मशानभूमी अनेक कारणांनी चर्चेत राहिली आहे. सिंदखेडराजापासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव साधारण दोन ते अडीच हजार लोकसंख्येचे आहे. या गावांमध्ये अजूनपर्यंत स्मशानभूमी नाही. गावातील सुज्ञ नागरिकांनी वर्गणी करून चार पाईप व त्यावर टिन टाकले आहे व तात्पुरती स्मशानभूमी तयार केली आहे. परंतु राजकीय पुढारी व गावातील नेतेमंडळी यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्मशानभूमी शेजारी संपूर्ण गांजर गवत उगवले असून, पाणी व लाईटची तेथे व्यवस्था नाही. त्यामुळे स्मशानभूमीसाठी अनेक समस्यांना गावातील लोकांना तोंड द्यावे लागत आहे. गावामध्ये जर कोणाचा मृत्यू झाला तर त्याचे दुःख वेगळे, परंतु आता अंत्यविधी कुठे करायचा, याचा मोठा प्रश्न घरातील मंडळींना व नातेवाईकांना पडतो. असाच प्रकार पावसाळ्यात दरेगाव येथील गणेश बंगाळे यांच्या बाबतीत घडला. गणेश यांचे वडील भास्कर पुंजाजी बंगाळे यांचा मृत्यू झाला असता, पावसाचे वातावरण तयार झाले होते. आता अंत्यविधी कुठे करायचा असा प्रश्न गावातील मंडळींसह घरातील मंडळी व नातेवाईकांना पडला होता. परंतु गणेश याने क्षणाचाही विलंब न लावता, माझ्या वडिलांचा अंत्यविधी हा माझ्या घरासमोरच करा, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नाही, तिथे लाईटची व्यवस्था नाही, खूप मोठे गटारेसुद्धा साचलेले आहेत. साप-इंचू यांचासुद्धा सुळसुळाट झालेला आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या वडिलांचा अंत्यविधीचा कार्यक्रम आपल्या घरासमोरच केला.
जो माणूस जन्माला येतो, त्याचा शेवटच्याक्षणी स्मशानभूमीमध्येच अंत्यविधी करावा लागतो. प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस मरण येणारच आहे, आणि स्मशानभूमीमध्ये यावेच लागेल, हे सत्य असतानासुद्धा गावातील गाव पुढारी आणि शासकीय कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी यांच्या लक्षात येत नाही का, असा सवाल निर्माण झालेला आहे. आज गणेश बंगाळे यांनी जे निवेदन दिले आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की, जी परिस्थिती माझ्या वडिलावर आली, ती परिस्थिती इतर कोणावरही येऊ नये, म्हणून मी दरेगाव येथील ग्रामविकास अधिकारी इंगळे यांना निवेदन देऊन सुसज्ज अशी स्मशानभूमी उभारण्याची मागणी केली आहे. हे गाव हे सिंदखेडराजा मतदारसंघातील शेवटचे गाव असून, या मतदारसंघाचे आमदार माजी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे हे आहेत. या आधीसुद्धा या गावांमध्ये स्मशानभूमीचा निधी आला होता. परंतु कुठे गेला, याचीसुद्धा गावामध्ये चर्चा होत आहे. तरी या मतदार संघाचे आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी या गावाच्या स्मशानभूमीचा प्रश्न लवकरात लवकर मिटवावा, अशी दरेगाववासीयांची मागणी आहे.
———–