– वारकरी संतापले, चिखली तालुक्यातील धार्मिक सलोखा अडचणीत
मेरा बुद्रूक, ता. चिखली ( प्रतिनिधी) – सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा पोलिस ठाणेअंतर्गत येणार्या गोरेगाव फाटा येथे धार्मिकतेच्या नावाखाली बुवाबाजीला ऊत आला असून, हिंदूधर्मिय गोरगरिब लोकांची भावनिक फसवणूक सुरु आहे. बुवाबाजीचे हे केंद्र तातडीने बंद करण्यात यावे, अन्यथा वारकरी संप्रदाय रस्त्यावर उतरेल, तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज्य वारकरी महामंडळाच्यावतीने जिल्हा पोलिस अधीक्षकांना साखरखेर्डा ठाणेदारांमार्फत निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. वारकरी महामंडळाचे काही पदाधिकारी व वारकरी बांधव हे गोरेगाव फाटा येथील बुवाबाजीचा पर्दाफास करण्यासाठी गेले असता, त्यांना तेथे मोबाईलवर व्हिडिओ शुटिंग करू दिले गेले नाही. तसेच, तेथून त्यांना जाण्यास बाध्य करण्यात आले. तेव्हा हे अंधश्रद्धेचे केंद्र त्वरित बंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. गोरेगाव फाटा येथील हे केंद्र परिसरात संतापाचे केंद्र ठरत असून, पोलिसांनी त्वरित ते हटविण्याची मागणी ऐरणीवर येऊ लागली आहे. विशिष्ट धर्मिय व्यक्ती तेथून प्रार्थना, बुवाबाजीच्या माध्यमातून धर्मांतर घडवून आणत असल्याचा आरोप परिसरातून खासगीत होत आहे.
गोरेगाव फाटा येथील संबंधित व्यक्ती हे प्रार्थनेच्या नावाखाली अंगातून भूत काढणे, करणी कवटाळ काढून देणे, आदी प्रकार करून गोरगरीब हिंदू बंधु-भगिनींना फसवत आहेत. तसेच, अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत. त्यातून गोरगरिब महिलांचे प्राण जाऊ शकतात. काही दिवसांपूर्वी अनेक संघटनांनी येथील बुवाबाजी बंद करण्यासाठी साखरखेर्डा पोलिस ठाण्याला तक्रारी दाखल केल्या होत्या. पोलिस प्रशासनाने त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करून बंद केले होते, व ते प्रकरण न्यायालयात निर्णयाधीन आहे. असे असतानादेखील ते पुन्हा बुवाबाजीचे प्रकार दिसून आले आहेत. हा प्रकार वारकरी महामंडळाच्या लक्षात येताच, त्यांनी तिथे जाऊन मोबाईलव्दारे व्हिडिओ शूटिंग चालू केले असता, तेथील काही व्यक्तींनी बळजबरी शूटिंग बंद करण्यास भाग पाडले. वारकरी महामंडळाच्या विश्वस्त मंडळाने पाहणी केली असता, तिथे अक्षरशः दोन तीन महिला बेशुद्ध पडलेल्या होत्या. त्यामुळे येथील गैरप्रकारामुळे महिलांचे जीव धोक्यात आलेले आहेत. त्यामुळे वारकरी महामंडळाच्यावतीने साखरखेर्डा पोलिस ठाणे गाठून, ठाणेदारांमार्फत बुलडाणा जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात नमूद आहे, की गेल्या अनेक दिवसांपासून ते बुवाबाजीचे केंद्र पुन्हा सुरू झाले आहे. दिनांक ३०/१०/ २०२२ रोजी रविवारी आम्ही त्या ठिकाणी गेलो असता, आम्हाला फोन बंद करण्यास सांगितले. हे लोकं त्या ठिकाणी देवाची प्रार्थना करत असतील तर आमच्या व्हिडिओ शुटिंग व रेकॉर्डिंगला बंदी का, असा प्रश्न निर्माण होतो आहे. आम्ही स्वतः त्या ठिकाणी सीरिअस असलेले पेशंट पाहिले असता, त्यांना योग्यवेळी उपचार झाले नाहीत, तर ते दगवण्याची शक्यता आहे. गोरेगाव येथील सर्व धोके लोकांच्या लक्षात आले आहेत, त्यांच्यावर बंधनेसुध्दा लादण्यात आली. परंतु शासनाचे सर्व बंधने झुगारून प्रार्थनेच्या नावाखाली पुन्हा तेथे बुवाबाजीचा खेळ सुरू आहे. त्यामुळे ठाणेदार साखरखेर्डा यांनी त्यांच्यावर कायमची बंदी घालावी, असा रिपोर्ट आपणाला दिला आहे, तरी योग्यतो निर्णय घेवून गोरेगाव फाट्यावरील बुवाबाजीच्या नावाखाली सुरू असलेली गरिबांची हेळसांड थांबवावी. अन्यथा, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पोलिस अधीक्षकांना देण्यात आलेला आहे. याप्रसंगी दामुअण्णा महाराज शिंगणे, हभप डॉ. सत्यविजय महाराज सुरूशे, विठोबा महाराज आटोळे, गणेश महाराज नालेगावकर, ज्ञानेश्वर महाराज गिते, सिध्देश्वर महाराज बुंध्दे, वैभव महाराज मांनतकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
—————