सोलापूरचे वादग्रस्त शिक्षणाधिकारी किरण लोहार लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात
सोलापूर (विशेष प्रतिनिधी) – सोलापूर जिल्हा परिषदेचे वादग्रस्त प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लोहार यांच्या सोबतच चैतन्य भागातील एका लिपिकासही यावेळी पकडण्यात आले. लोहारांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती, तडजोडी अंती २५ हजार रुपये ठरले होते, अशी माहिती समोर आली आहे. ग्लोबल टीचर अवार्ड विजेते रणजित डिसले गुरुजी यांच्यावर आरोप केल्यांतर शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार चर्चेत आले होते. तसेच, त्यांचा कार्यकाळ एकूणच वादग्रस्त राहिलेला आहे.
पाचवी ते आठवीचे वर्ग वाढण्यासाठी एका स्वयंअर्थसहाय शाळेने वर्गवाढीच्या परवानगीची मागणी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहारा यांच्याकडे केली होती. त्याचा आयडी देण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली. सुट्ट्यांमुळे पैसे द्यायला थोडा विलंब झाला होता. सोमवारी (ता. ३१) तक्रारदाराला कार्यालयात बोलावून त्याच्याकडून २५ हजार रुपये स्वीकारले. त्यावेळी परिसरात दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधित विभागाच्या अधिकार्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी लोहार यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर पुढील कारवाई केली जात आहे.
शिक्षणाधिकारी किरण लोहार हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील आहेत. कामकाजाच्या प्रत्येक ठिकाणी वादग्रस्त अधिकारी म्हणून लोहार यांच्यावर शिक्का मारण्यात आला. कोल्हापूरमधील लोहार यांची कारकीर्द तर चांगलीच गाजली होती. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सभागृहातच किरण लोहार यांच्यावर पैसे घेतल्याचे आरोप सदस्यांनी केले. शिवाय, अनेक गंभीर तक्रारीवरूनच त्यांना जिल्हा परिषदेमधून एकतर्फी कार्यमुक्त केले. मात्र पुढे ते मॅटमध्ये गेले. लोहार यांच्या मुद्द्यावरून संपूर्ण सभागृह एकदा बंद पडले होते. लोहार यांच्या वादग्रस्त कामकाजाच्या चौकशीचा अहवाल तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षांकडे पाठवला होता. चौकशी समितीने लोहार यांच्या कामकाजासंबंधी ४३ तक्रारींची चौकशी केली होती. त्यामध्ये कर्तव्यात कसूर करणे, दप्तर दिरंगाई करणे, सरकारी नियमांचे उल्लंघन करणे, हेतुपूर्वक जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गैरहजर राहणे असे आरोप लोहार यांच्यावर ठेवण्यात आले होते. तसेच, डिसले गुरुजींवर कारवाई करून, त्यांच्याकडून ३४ महिन्यांचा पगार वसूल करूनही लोहार हे चर्चेत आले होते.
लोहार यांच्याबाबत अनेक तक्रारी होत्या. अखेर त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचा हातोडा पडला आहे. आता या प्रकरणातील तक्रारदार यांची उत्तर सोलापूर तालुक्यात एक स्वयंअर्थसहाय्य शाळा आहे. त्यांच्या यू-डायसवर सही करण्यासाठी शिक्षणाधिकारी लोहार यांनी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी यांनी २५ हजार देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांनी अँटी करप्शन विभागाशी संपर्क साधून तक्रार केली. सोमवारी जिल्हा परिषदेच्या त्यांच्या कार्यालयात पाच वाजून ४५ मिनिटांनी त्यांना २५ हजार घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी सदर बाझार पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कालच राज्यस्तरीय पुरस्कार, आज लाच घेताना चतुर्भूज!
कालच, रविवारी (ता.३०) लोहार यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभुराज देसाई यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता. त्याच्या दुसर्याच दिवशी ते लाच घेताना रंगेहाथ पकडले, हे विशेष. लाचलुचपतचे पोलिस निरीक्षक उमेश महाडिक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. यापूर्वी शिक्षक रणजीत डिसले यांना जेव्हा आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली होती, तेव्हा ती शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी आपल्याला मिळू दिली नाही, असा आरोप डिसले यांनी रडतरडत केला होता. त्यावेळी डिसले कसे चुकीचे आहेत, त्यांना ही शिष्यवृत्ती मिळू शकत नाही, असे सांगण्याचा प्रयत्न या लोहार यांनी केला होता.
——————–