Breaking newsHead linesMaharashtraPachhim MaharashtraWorld update

विठूरायाच्या दर्शनासाठी जाणार्‍या वारकर्‍यांवर काळाचा घाला, ७ मृत्युमुखी

– ८ वारकरी गंभीर जखमी, वैद्यकीय उपचार सुरु
– मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखाची तातडीची मदत जाहीर, अजित पवारांनीही केली विचारपूस

कोल्हापूर (शिवानी प्रभावळे) – कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला जाणार्‍या वारकर्‍यांवर काळाने घाला घातला आहे. मिरज-पंढरपूर महामार्गावर जुनोनी येथे पायी दिंडीत कार घुसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सात वारकर्‍यांचा कारखाली चिरडून मृत्यू झाला असून, सहा वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व वारकरी कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील आहेत. कार्तिकी एकदशीनिमित्त ३२ वारकरी विठूरायाच्या दर्शनाला पायी पंढरपूरला जात होते, तेव्हा हा अपघात घडला. या घटनेने हळहळ व्यक्त होत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून मदत कार्याची माहिती घेतली. राज्य सरकारकडून तातडीने पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील विठ्ठल भक्त मंडळाच्यावतीने पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ आज सायंकाळी सात वाजता एक भरधाव कार थेट दिंडीत घुसली. या अपघातात तब्बल १५ वारकरी गंभीर जखमी झाले होते. यातील ७ जणांचा मृत्यू झाला असून, ८ जण गंभीर जखमी आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पाच महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. वारकर्‍यांना धडक देणार्‍या टाटा नेक्सॉन कारमधील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, कारमधील व्यक्ती या सांगोला तालुक्यातील सोनंद या गावातील रहिवासी आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच जठारवाडी गाव शोकसागरात बुडाला. अपघातामधील मृतांची नेमकी नावे समजत नसल्यामुळे गावातील लोकांची घालमेल झाली होती. काही ग्रामस्थ अपघाताची माहिती मिळताच सांगोल्याकडे रवाना झाले होते. या घटनेने कार्तिकी यात्रेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर अपघातातील सर्व जखमींना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकर्‍यांना सांगोला-मिरज मार्गावर वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीचीदेखील त्यांनी घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हे वृत्त कळताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. तसेच या घटनेतील जखमी वारकर्‍यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे, असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.


– मृतांची नावे पुढील प्रमाणे –

१.शारदा आनंदा घोडके ६१ वर्ष
२.सुशीला पवार
३.रंजना बळवंत जाधव
४.गौरव पवार १४ वर्ष
५.सर्जेराव श्रीपती जाधव
६.सुनिता सुभाष काटे
७.शांताबाई शिवाजी जाधव

– जखमींची नावे –
१. अनिता गोपीनाथ जगदाळे
२. अनिता सरदार जाधव
३. सरिता अरुण सीयेकर
४. शानुताई विलास सीयेकर
५. सुभाष केशव काटे
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!