राहुल गांधींची शेगाव, नांदेडात विराट जाहीर सभा
– ७ नोव्हेंबरला भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात प्रवेश
मुंबई (प्रतिनिधी) – काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काश्मीर ते कन्याकुमारी निघालेली भारत जोडो यात्रेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या ५ राज्यातून आतापर्यंत ५३ दिवस ही पदयात्रा सुरु आहे. महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरला या पदयात्रेचा प्रवेश होत असून, महाराष्ट्र राज्यतूनही जनतेचा मोठा प्रतिसाद मिळून ही पदयात्रा इतिहास निर्माण करेल, असा विश्वास अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी व्यक्त केला. ही यात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात पोहोचणार असून, शेगाव व नांदेड येथे विराट जाहीर सभा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या यात्रेत सहभागी होण्यासाठी समविचारी पक्षांनाही आमंत्रण देण्यात आलेले असून ते त्यांनी स्विकारलेले आहे.
टिळक भवन येथे के. सी. वेणुगोपाल यांनी भारत जोडो यात्रेसंदर्भात महाराष्ट्रातील तयारीची आढावा बैठक घेतली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने भारत जोडो यात्रेसाठी केलेल्या तयारीबद्दल वेणुगोपाल यांनी समाधान व्यक्त केले. या बैठकीला प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट, माजी मंत्री यशोमती ठाकूर, अमित देशमुख, अस्लम शेख, सतेज बंटी पाटील, डॉ. विश्वजीत कदम, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेटा डिसुझा, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, बसवराज पाटील, प्रणिती शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुवा, सोनल पटेल, संपतकुमार, मुंबई युवक काँग्रेसचे झिशान सिद्दीकी, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, खा. कुमार केतकर, हुसेन दलवाई, माजी खासदार मिलिंद देवरा, सेवादलाचे विलास औताडे, आ. अमिन पटेल, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर वेणुगोपाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, भारत जोडो यात्रा ही राजकीय यात्रा नाही. आतापर्यंत कोणत्याही पक्षाने अशा पद्धतीची पदयात्रा काढलेली नाही. १५० दिवस, दररोज २५ किमी पदयात्रा करणे हे सोपे काम नाही पण राहुल गांधी यांनी ते करून दाखवले आहे. या पदयात्रेला प्रत्येक राज्यातून दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत आहे. राहुल गांधी यांची बदनामी करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम भाजपाने केले पण या पदयात्रेने जनतेला राहुल गांधी यांच्या व्यक्तीमत्वाची ओळख झाली आहे. या पदयात्रेत महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगार यांच्यासह देशातील ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडली जात आहे म्हणून महिला, तरुण, शेतकरी, व्यापारी यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मोदी सरकारने दरवर्षी २ कोटी नोकर्या देण्याचे आश्वासन देऊन तरुणांची फसवणूक केली आहे, त्यामुळे तरुण वर्गात प्रचंड नाराजी आहे तर महागाईमुळे महिला व सामान्य जनतेत तीव्र संताप दिसत आहे. केंद्रातील भाजपा सरकारने सीबीआय, ईडी, आयकर सह सर्व स्वायत्त संस्थाचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे. निवडणूक आयोग व न्यायपालिकाही सुरक्षित राहिलेल्या नाहीत हे चित्र आहे. देशातील सद्य परिस्थितीचे प्रतिबिंब भारत जोडो यात्रेत उमटत आहे. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबरला प्रवेश करत असून नांदेड व शेगाव येथे दोन जाहीर सभा आयोजित केलेल्या आहेत. या यात्रेत सहभागी होण्यासाठी समविचारी पक्षांनाही आमंत्रण देण्यात आलेले असून ते त्यांनी स्विकारलेले आहे.
यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भारत जोडो यात्रेसाठी महाराष्ट्र सज्ज असून प्रदेश काँग्रेसने या यात्रेसाठी सर्व तयारी केलेली आहे. ही यात्रा महाराष्ट्रातही यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने लोक सहभागी होतील. भय, भूक, भ्रष्टाचार हेच भाजपाने दिले आहे. देश, लोकशाही व संविधान वाचवण्याच्या या ऐतिहासिक पदयात्रेत महाराष्ट्रातून जनता मोठ्या उत्साहाने सहभागी होतील व ही पदयात्रा महाराष्ट्रात यशस्वी करु, असेही पटोले म्हणाले.
——————-