सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – सिंदखेडराजा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिवाळीच्या मुहूर्तावर मोठा राजकीय धक्का बसला आहे. तबल ३० वर्षे ज्येष्ठ नेते शरद पवार व डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेले नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष राजेंद्र अंभोरे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षात गेले आहेत.
मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, खासदार प्रतापराव जाधव, माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या नेतृत्वात अंभोरे व त्यांच्या समर्थकांनी शिंदे गटांमध्ये प्रवेश केला. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे उपजिल्हाप्रमुख दीपक बोरकर, तालुकाप्रमुख शिवप्रसाद ठाकरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख आतिश तायडे, सिंदखेडराजा शहर प्रमुख तथा नगरपरिषद सभापती बालाजी मेहत्रे, प्रदीप मेहत्रे, संतोष बर्डे हे प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसला हा दुसरा धक्का आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप मेहत्रे यांनीदेखील दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे मंत्री अतुल सावे, आमदार संजय कुटे, विनोद वाघ, विष्णू मेहेत्रे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.