– राष्ट्रवादी काँग्रेसने पोलिसांत दाखल केली तक्रार
– गुलाबराव पाटलांचा शोध घ्या, त्यांना बुलढाण्यात आणा!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री बेपत्ता झाले असून, त्यांचा शोध घेऊन त्यांना बुलढाण्यात घेऊन यावे, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसने बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. परतीच्या पावसाने शेतकर्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे, तसेच, जिल्ह्यात एकही विकासकाम सुरु नाही. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकाही होत नाहीत. पालकमंत्रीच बेपत्ता झाल्याने स्थानिक जिल्हा पातळीवर कोणताही वचक राहिलेला नाही, तेव्हा पालकमंत्र्यांचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने पोलिसांकडे केली आहे. पावसाने जिल्ह्यात हाहाकार उडविला असताना, पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्ह्याकडे फिरकले नाहीत, त्याचा अशा अजब पद्धतीने राष्ट्रवादीने निषेध नोंदवला आहे.
याबाबत पोलिसांत दाखल तक्रारीत नमूद आहे, की राज्यात शिंदे-फडणवीस सरकारला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. या शंभर दिवसात या जोडगोळीने हजारपेक्षा जास्त निर्णय जाहीर केले, पण त्यातील एकाही निर्णयाची अमलबजावणी झाली नाही. केंद्रातील मोदी-शाह जोडगोळीप्रमाणे ही शिंदे-फडणवीसांची जोडगोळी जनतेला फक्त गाजर दाखवत आहेत. विरोधी पक्षाच्या टिकेनंतर त्यांनी पालकमंत्री जाहीर केले. परंतु, हे पालकमंत्री नाममात्र दिसत असून, त्यांना कोणतेही अधिकार नसल्याने ते चकव्यासारखे इकडे तिकडे फिरताना दिसत आहेत. आजरोजी बुलढाणा जिल्ह्यावर व येथील शेतकर्यांवर परतीच्या पावसाने एवढे मोठे संकट कोसळले असताना, पालकमंत्री गायब आहेत. परतीच्या पावसाने शेतकर्यांचे झालेले नुकसान मीडियातून जगजाहीर झाले असताना, पालकमंत्री बुलढाणा जिल्ह्याचा रस्ता विसरले की काय, असा सवाल निर्माण होतो. सगळी विकासकामे ठप्प पडली असून, जिल्हा नियोजन समितीची बैठकही झालेली नाही. त्यामुळे जनतेची कामे रखडली आहेत. तरी, राज्य शासनाने ज्यांना बुलढाण्याचे पालकत्व बहाल केलेले आहे, त्या मंत्री गुलाबराव पाटील यांचा शोध घेऊन त्यांना बुलढाण्यात आणावे, व आम्हाला न्याय द्यावा. जेणे करून बुलढाणावासीयांच्या समस्या पालकमंत्री महोदयाकडे मांडता येतील, असेही पोलिसांत दाखल तक्रारअर्जात नमूद आहे.
या तक्रारअर्जावर अनिल बावस्कर, राजेश गवई, मंगेश बिडवे, संदीप तायडे, सत्तार कुरैशी, नाजीमाताई खान, विनोद गवई, संतोष पवार, मनिष बोरकर, विशाल फदाट, वैâलास चव्हाण, संतोष पवार आदींच्या सह्या आहेत.
————-