राजकारण हा गलिच्छ माणसांचा खेळ आहे, असे राजकरणाच्या बाबतीत सर्रास म्हटल्या जाते, आणि याच कारणामुळे सज्जन माणसे राजकारणाकडे वळत नाहीत. मात्र राजकारणात राहूनही सज्जनपणा जोपासता येतो, अबाधित ठेवता येतो हे ज्या माणसाने कृतीतून दाखवले ते म्हणजे माजी आमदार विठ्ठलराव उर्फ बाबुराव पाटील. बाबुराव पाटील म्हणजे, राजकारणातील नितळ प्रतिमा असलेला सज्जन गृहस्थ. ना कुठला आरोप ना कुठलं डागाळलेपण.. ना कुणाला संपविण्यासाठी आपल्या राजकीय ताकदीचा दुरुपयोग केला, की ना कधीं आपली निष्ठा विकली. काँग्रेसच्या विचारधारेवर आणि त्याच विचारांशी एकनिष्ठ राहत शेवटपर्यंत त्यांनी आपल्या विचाराला तडा जाऊ दिला नाही.
राजकारणात एकदा पद मिळाले की पदाशिवाय राहणं म्हणजे पाण्याशिवाय माशाने राहणे, अशी अवस्था होऊन जाते. पद मिळविण्यासाठी अथवा असलेली खुर्ची टिकविण्यासाठी कोलांटउड्या मारणारे खूप बघायला मिळतात. मात्र स्व. बाबुराव पाटील यांनी तसे काहीही न करता काँग्रेसच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासाठी ते शेवटपर्यंत मार्गदर्शक म्हणूनच राहले. साधी राहणी, उंच बांधा, चेहर्यावर सतत प्रसन्न भाव, आपल्यापेक्षा वयानेदेखील लहान असलेल्या व्यक्तीला आदराने बोलणे आणि समाजात प्रत्येकाच्या सुखदुःखात जातीने हजर राहणे, हा त्यांचा स्वभाव हीच त्यांची खरी ओळख होती. माणूस म्हणून जगणारा आणि सतत माणुसकी अंगी बाळगणारा हा नेता निगर्वी होता. त्यांच्या जाण्याने राजकारणातील स्वच्छ प्रतिमेचा चेहरा काळाच्या पडद्याआड गेला आहे.
स्व.बाबुराव पाटील आणि माझे भ्रमणध्वनी वर नेहमी बोलणे व्हायचे, माझा वाढदिवस असला की आवर्जून त्यांचा कॉल यायचा. मेहकरला एका लग्नात आले तेव्हा मी त्यांना घरी या अशी विनंती केली, न चुकता ते घरी आले व गप्पा रंगल्या. त्यांच्या गप्पांचा विषय असायचा माझे वडील स्व. रा. ना. पवार आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष स्व. भास्करराव खेडेकर. माझ्या बाबांचे वक्तृत्व, त्यांचे सामाजिक कार्य, त्यांचा राजकीय अभ्यास, स्वतःसाठी काहीही न करता त्यांनी अनेकांना कसे घडवले हे सारे किस्से ते सांगायचे. माझ्या दुसर्या निवडणुकीवेळी भाऊसाहेब पवार (माझे वडील स्व. राना पवार ) यांनी व भास्करराव खेडेकर, स्व.अॅड. एस टी म्हस्के यांनी माझा मतदारसंघ कसा पिंजून काढला, माझ्या विजयासाठी किती प्रयत्न केले, हे सांगून कृतज्ञता व्यक्त करायचे. मुंबईला आले की तुमचे वडील भाऊसाहेब माझ्या किंवा कायंदे साहेबांच्या रूम वर थांबायचे, त्यावेळी राजकारणातील अनेक किस्से ऐकायला मिळायचे, हा सगळा उल्लेख त्यांच्या तोंडून ऐकत असतांना तुम्ही पवार साहेबांच्या पावलावर पाऊल टाकले, असे म्हणून माझे देखील ते तोंडभरून कौतुक करायचे.
मला आदरणीय बाबुराव पाटील यांच्याबद्दल नितांत आदर वाटत होता. पत्रकारितेमुळे अनेक राजकारणी मीदेखील बघितले. स्वतःच्या पलीकडे जाऊन ही मंडळी दुसर्याचा फारसा विचार करत नाहीत. वैयक्तिक स्वार्थाशिवाय दुसर्यासाठी काही करणे हे त्यांच्या गावी नसते. मात्र या पलीकडे जाऊन स्व. बाबुराव पाटील हे समाजाचा- लोकांचा विचार करणारे लोकाभिमुख नेतृत्व होते आणि म्हणूनच आमदारकी गेल्यानंतरदेखील आजपावेतो ते लोकांच्या मनातील शेवटपर्यंत आमदारच राहले. लोकाभिमुख, निःस्वार्थ आणि स्वच्छ प्रतिमा असणार्या स्व. बाबुराव पाटील या लोकनेत्यास माझी भावपूर्ण आदरांजली.
(लेखक हे ज्येष्ठ पत्रकार असून, विदर्भातील आघाडीचे दैनिक देशोन्नतीचे मेहकर विशेष प्रतिनिधी तथा ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे संपादकीय सल्लागार आहेत. राहणार ‘गोडवा’, बालाजी नगर, मेहकर, जि. बुलढाणा)