मराठा आरक्षणाचे विरोधक गुणरत्न सदावर्तेंची मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत ‘गुप्तगू’!
– मराठा मोर्चा समन्वयकांचा सदावर्ते-पाटील यांच्या भेटीवर तीव्र आक्षेप
पुणे (विशेष प्रतिनिधी) – राज्यातील शिवसेनेचे बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने नियुक्त केलेल्या मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षणाला विरोध करणार्या सदावर्ते दाम्पत्याने मंगळवारी रात्री तब्बल दोन तास खासगीत भेट घेऊन चर्चा केल्याने मराठा मोर्चाचे समन्वयक खवळले आहेत. त्यांनी या भेटीवर तीव्र आक्षेप घेतला असून, पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधकाची भेट का घेतली, याचा खुलासा करावा, अशी मागणी केली आहे.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी मंत्री चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठित केली आहे. परंतु, मंगळवारी रात्री चंद्रकांत पाटील यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह त्यांच्या पत्नीशी गुप्त भेट घेत चर्चा केली. या भेटी संदर्भात चंद्रकांत पाटील आणि सदावर्ते दाम्पत्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. मात्र मंगळवारी रात्री दोन तास बंद दाराआड चर्चा झाली ती नक्की कशा संदर्भात होती, अशा अनेक चर्चा सध्या राज्यात सुरू आहेत. त्यामुळे मराठा समाज संतप्त झालेला आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधातच गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी नेहमी भूमिका मांडली आहे. विशेष बाब म्हणजे, या दाम्पत्याच्या भेटीपूर्वी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयकदेखील चंद्रकांत पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. मात्र त्यांना न भेटता, मराठा आरक्षणाचे विरोधक असलेल्या गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटल यांची भेट चंद्रकांत पाटलांनी का घेतली, असा सवाल मराठा मोर्चा समन्वयकांनी उपस्थित केला आहे. या भेटीवर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी तीव्र आक्षेप घेतला असून, मराठा आरक्षणाच्या मारेकर्यांची भेट चंद्रकांत पाटील यांनी का घेतली? ज्यांनी आयुष्यभर मराठा समाजाच्या विरोधात आपली भूमिका मांडली, त्यांनी आत्ताच चंद्रकांत पाटलांची का भेट घेतली, हे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट करावे, असे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी म्हटले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, यासाठी जयश्री पाटील आणि गुणरत्न सदावर्ते या दाम्पत्याने न्यायालयीन लढा दिला होता. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही. वेळोवेळी मराठा आरक्षणाच्या विरोधातच गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी भूमिका मांडली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सदावर्ते दाम्पत्याची खासगीत भेट घेऊन चर्चा करत असतील, तर सरकारचा हेतू चांगला नाही, अशा आक्षेपाचा सूर मराठा समाजातून उमटत आहे.
————-