– उरलेसुरले सोयाबीन पीकही गेले, ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी झाला उद््ध्वस्त
– महसूल व कृषी विभागाच्या डोळ्यावर गेंड्याची कातडी, पंचनाम्यांसाठी काहीच हालचाल नाही!
चिखली (एकनाथ माळेकर) – परतीच्या जोरदार पावसाने पैनगंगा नदीला पूर आला असून, रात्री तीन वाजेपासून हातणी पुलावरून पाच ते सहा फुटाने पाणी वाहात असल्याने, बुलढाणा ते चिखली मार्ग बंद पडला आहे. रात्रीपासून वाहतूक विस्कळीत झाल्याने, पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली होती. चिखली, बुलढाणा, मेहकर, लोणार तालुक्यात कालच्या पावसाने हाहाकार उडविला असून, उरलेसुरले सोयाबीन पीकही नष्ट झाले आहे. त्यातच, पैनगंगेच्या पुराचा फटका नदीकाठच्या शेती व गावांना बसला असून, शेतीपिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे अतिवृष्टी, परतीचा पाऊस पाहाता, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी ऐरणीवर आलेली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात काल रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला असून, पैनगंगा नदीला पूर आला आहे. तसेच खडकपूर्णादेखील दुथडी भरून वाहात आहे. पैनगंगेच्या पुरामुळे हातणी येथील पुलावरून पाच ते सहा फुटाने पाणी वाहात असून, त्यामुळे बुलढाणा ते चिखली या राज्य मार्गावरील वाहतूक रात्री तीन वाजेपासून ठप्प झाली होती. त्यामुळे चिखली पोलिसांनी तातडीने पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली. चिखली व बुलढाणा तालुक्यात अद्यापही पाऊस सुरुच असून, पैनगंगेच्या पुराचा दुधा, ब्रम्हपुरी, कल्याणा, उसरण, नागझरी, बाभुळखेड, मेहकर, परतापूर, अंत्री देशमुख, बोरी, सोनाटी आदी गावांना मोठा फटका बसला आहे. नदीकाठच्या अनेक शेतात पाणी घुसले असून, सोयाबीनचे उरले सुरले पीकही मुळासकट वाहून चालले आहे. मेहकर व चिखली तालुक्यात तर पावसाने हाहाकार उडविला असून, सोंगून ठेवलेली सोयाबीन, काही ठिकाणी तूर, कपाशी, मका ही पिके जमिनीवर लोळली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात पावसाने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. परतीचा पाऊस, अतिवृष्टी आणि नदीच्या पुरामुळे हजारो हेक्टरवरील पिके मातीमोल झाल्याचे भीषण चित्र मेहकर, चिखली, बुलढाणा, सिंदखेडराजा, लोणार तालुक्यांत आहे. बँकांचे कर्ज, उसनवारी करून पिकांसाठी केलेला खर्च पाण्यात गेला असून, शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बुलढाणा जिल्ह्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, व शक्य तितक्या लवकर आर्थिक मदत द्यावी, अन्यथा या तालुक्यांत शेतकरी आत्महत्या वाढण्याची भीती निर्माण झालेली आहे. विशेष धक्कादायक बाब अशी, की जिल्ह्यात ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असताना, महसूल व कृषी विभागाचे अधिकारी गेंड्याची कातडी पांघरून बसले असून, अजून त्यांनी पंचनामे हाती घेतलेले नाहीत. तेव्हा, पालकमंत्र्यांनी तातडीने अधिकार्यांना पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही पुढे आली आहे.
——————