– काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह सर्वपक्षीय नेत्यांकडून शोक व्यक्त
चिखली (विशेष प्रतिनिधी) – १९८५च्या दशकात बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे अखिल भारतीय काँग्रेसचे आमदार राहिलेले बाबुराव जी. पाटील यांचे आज (दि.१९) सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ते चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे येथील रहिवासी होते. दुपारी २.०० वाजता सावरगाव डुकरे येथेच त्यांच्यावर शाेकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित हाेते. त्यांच्या निधनाबद्दल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसह सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह सर्व पक्षीय नेत्यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केलेल्या आहेत.
माजी आमदार बाबुराव जी. पाटील यांचा जन्म १९ जानेवारी १९३६ रोजी चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे येथे झाला होता. लहानपणापासून शिक्षणाची आवड असल्याने त्यांचे शालेय शिक्षण चिखली येथे झाले होते. त्यांची राजकीय जीवनाची सुरुवात पंचायत समिती सदस्य बुलढाणा ते सभापती बुलढाणा अशी झाली. त्यांच्या पश्चात एक भाऊ, तीन बहिणी, दोन मुले, एक मुलगी अंत्री खेडेकर येथील खेडेकर घराण्यात, तर दुसरी मुलगी मोरे पाटील घराणा चाळीसगाव येथे दिलेली आहे. तसेच, बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांना वाचनाची आवड होती, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचे ते निकटचे सहकारी होते. १९८५ ते १९९० मध्ये ते बुलढाणा विधानसभेचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार होते. त्यांचे शिक्षण एसएससीपर्यंत झालेले होते, १९९५ मध्ये मतदारसंघ बदलल्यामुळे त्यांनी चिखली येथून निवडणूक लढली होती, त्यावेळेस त्यांचा थोड्या मताने पराभव झाला होता. आज दीर्घ आजाराने सकाळी त्यांचे देहावसन झाले.
—————