मुंबई (विशेष प्रतिनिधी) – राज्य परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचार्यांना राज्य सरकारने दिवाळी बोनस जाहीर केला आहे. त्यानुसार, कर्मचार्यांना २,५०० रुपये तर अधिकार्यांना ५,००० रुपये बोनस मिळणार आहे. या खर्चापोटी एसटी महामंडळाकडे राज्य शासनाकडून ४५ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत.
बेस्ट कर्मचार्यांप्रमाणे एसटी कर्मचार्यांनासुद्धा दिवाळी बोनस द्यावा, अशी मागणी एसटी कर्मचार्यांनी केली होती. एसटी कर्मचार्यांना बोनस द्यावा, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता यांच्यात वाढ करून तो ३४ टक्क्यांपर्यंत करावा आणि दिवाळीपूर्वी थकबाकी देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनामार्फत करण्यात आली होती. त्याची दखल घेत, राज्य सरकारने ३०० कोटी या जाहीर केलेल्या रकमेतून ४५ कोटी रुपये तातडीने वर्ग केले आहेत. दरम्यान, एसटी महामंडळाचे रखडलेले वेतन, विविध सवलत मूल्य आणि रखडलेल्या भत्त्यांसाठी राज्य सरकारने ३०० कोटींच्या निधीला नव्याने मान्यता दिली आहे. एसटी कर्मचार्यांच्या वेतनासाठी २०२२-२३ मध्ये सरकारने विविध सवलत मूल्यांपोटी १३८८.५० कोटी शिल्लक तरतुदीमधून ३०० कोटींना ही मान्यता दिली. गेल्या काही दिवसांमध्ये फडणवीस-शिंदे सरकारकडून एसटी कर्मचार्यांना मासिक वेतनासाठी ठोस मदत होत नसल्याची टीका होत होती, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.