– शेतरस्तेही बनवले नाहीत, भुयारीमार्गही धोकादायक बनले, शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत!
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – नागपूर ते मुंबई या ७०० किलोमीटरच्या सुपर एक्स्प्रेस समृद्धी महामार्गाचे लवकरच उद््घाटन करण्याची घोषणा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने केली आहे. परंतु, हा महामार्ग शेतकर्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. शेतरस्त्यांना जोडणारे या महामार्गाखालील भुयारीमार्ग हे शेतकर्यांसाठी प्रचंड डोकेदुखी ठरले असून, या गंभीर बाबीकडे समृद्धी महामार्ग प्रशासन व जिल्हाधिकारीदेखील दुर्लक्ष करत असल्याने शेतकर्यांतून संताप व्यक्त होत आहे.
समृद्धी महामार्गाची घोषणा झाली तेव्हा सांगण्यात आले होते, की महामार्ग लगतच्या दुतर्फा शेतरस्ते राहतील, तसेच या शेतरस्त्यांवर जाण्यासाठी भुयारीमार्गदेखील राहतील. मेहकर तालुक्यातील चायगाव, शिवपुरी, पारडा येथील शेतकर्यांनी वेळोवेळी आंदोलन करून रस्त्याचे काम बंद पाडून शेतरस्त्यांची मागणी केलेली होती. त्यानुसार अगोदर कंपनीचे अधिकारी व नंतर एमएसआरडीसा चे अधिकारीही पाहणी करून गेलेले आहेत. परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची सुविधा शेतकर्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. बाजूच्या रस्त्यांसाठी शेतकर्यांनी आतापर्यंत कितीतरी वेळा आंदोलन केले आहे. तसेच या समृद्धी महामार्गाच्या खालून जाणारे शेतरस्त्यांसाठीचे भुयारी मार्ग हे खूप खोलवर असून, त्यामध्ये विजेची कोणत्याही प्रकारची सुविधा अद्यापपर्यंत उपलब्ध झालेली नाही. या भुयारीमार्गातून जात असताना समोर काहीच दिसत नाही, त्यात दीड फुटापर्यंत पाणी व गाळ साचलेला आहे. याच रस्त्यातून शेतकर्यांना तसेच महिलांना जावे लागते. म्हणजे, एकूणच हे भुयारीमार्ग शेतकर्यांसाठी धोकादायक व जीवघेणे ठरलेले आहेत. तरी या भुयारीमार्गांमध्ये विजेची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, तसेच सर्विस रोड तयार करून देण्यात यावेत, अशीच मागणी शेतकरी करत आहे. अन्यथा, शेतकरी पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत आहेत.
——————-