AURANGABADHead linesMaharashtra

खोटं बोलण बंद करा, मराठ्यांना ‘ओबीसी’तून आरक्षण द्या!

– नानासाहेब जावळे पाटील यांनी भाजप सरकारला ठणकावले!

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी) – राज्यातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार आणि केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार हे भाजपचेच आहे. त्यामुळे या सरकारने ठरवले तर मराठा समाजाला ओबीसी (इतर मागासवर्ग) प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेणे या सरकारला कठीण नाही, त्यामुळे आता खोटं बोलण बंद आणि प्रत्यक्ष कृती करावी, यासाठी नोव्हेंबरमध्ये अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या नेतृत्वात एक लाखांचा मोर्चा मंत्रालयावर घेऊन जाणार आहोत. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असा निर्धार अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी २७ वर्षांपासून अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना संघर्ष करत आहे. संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जावळे पाटील यांनी आपल आयुष्य समाजासाठी खर्ची घातले. ४८ मराठा तरुणांनी बलिदान दिले. गांधीजींच्या अहिंसा व लोकशाही मार्गेने ५८ मोर्चे निघाले. तरी सरकारला कळत नसेल तर आगामी काळात ज्या भाषेत कळेल, त्याच भाषेत सांगण्यासाठी १ लाख छावे मुंबईला जाणार आहेत. त्याचे नियोजन आजपासूनच सुरु झाले आहे, असेही जावळे पाटील यांनी सांगितले. मराठा मुलांना शिक्षण व नोकरी मिळाली नाहीतर ते नक्षलवादी होतील. सत्ताधार्‍यांना सळो की पळो करून सोडतील, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला.

मराठा समन्वयक म्हणून समाजाची वाट लावणार्‍या समन्वयकांचे आम्ही सीबीआय, ईडी, पोलिसांना अकाउंट चेक करायला लावणार आहोत. त्यांच्याकडे आलेला पैसा कसा आला? गाड्या कधी खरीदी केल्या? यासाठी पैसे कुणी दिले? मुंबईला जाऊन आणि फेसबुक लाईव्ह करणार्‍या व समाजाच्या नावाने राजकीय नेत्यांकडून पैसे लाटणार्‍या समाजद्रोहींना आम्ही धडा शिकवणार असल्याचेही जावळे पाटील यांनी ठणकावले आहे.


पहिला विभागीय मेळावा मंगळवारी औरंगाबादेत आम्ही घेतला आहे. टप्प्याटप्प्याने संपूर्ण मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही मेळावे घेऊन जनजागृती केली जाणार असल्याचे जावळे पाटील यांनी सांगितले. यावेळी कार्याध्यक्ष भिमराव मराठे, विद्यार्थी आघाडी प्रदेश अध्यक्ष विजय कुमार घाडगे पाटील, प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे, प्रदेश संघटक बालाजी सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष अशोक मोरे, किशोर शिरावत आणि मोठ्या संख्येने छावा कार्यकर्ते उपस्थित होते.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!