परतीच्या पावसाने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला, पालकमंत्री कुठे आहेत?
– नगदी सोयाबीन पिकाची नासाडी, कपाशीही धोक्यात
एकनाथ माळेकर
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार उडविला असून, नगदी पीक असलेल्या सोयाबीनची पूर्णपणे नासाडी केली आहे. सोयाबीन सोंगून ठेवले पण पावसाने सुड्याच्या सुड्या भिजवल्याने हे सोयाबीन खराब झाले असून, त्यांना कोंब फुटले आहे. त्यामुळे सोयाबीन विकून दिवाळी सण साजरा करण्याचे स्वप्न पाहणार्या शेतकर्यांच्या स्वप्नाची पावसाने नासाडी केली आहे. अनेक ठिकाणी कपाशी, सोयाबीन, उडीद, तूर आदी पिकांचे नुकसान झाले असून, उडीद व सोयाबीनच्या कापणीला अडथळा तर आलाच पण हे पीक पाण्यात सडून गेले आहे. शेतात साचलेल्या पाण्यामुळे व चिखलामुळे पिकांची वाहतूक करणेही कठीण झाले आहे. एकंदरीत या पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. या पावसासह वीज पडल्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटनादेखील जिल्ह्यात घडल्या आहेत. जिल्ह्यातील शेतकरी पुरता उद््ध्वस्त झाला असताना पालकमंत्री गुलाबराव पाटील कुठे आहेत, शेतकर्यांना दिलासा कधी देणार आहेत, असा सवाल शेतकरी करत आहेत.
सोयाबीन सोंगणीच्या तोंडासी आले असता, पावसाने बुलढाणा जिल्ह्यामध्ये ढगफुटीच्या रूपाने शेतकर्याला हवालदिल करून सोडले आहे. आज शेतकरी दिवाळीच्या खरेदीचे स्वप्न रंगवत असतानाच निसर्गाने शेतकर्याच्या आशेवर पाणी फिरवले आहे. शेतकर्यांवर कृषी केंद्रवाल्यांची उधारी आहे, शेतामध्ये सोयाबीन आली की देऊ, अशा जबानीवर शेतकर्यांनी कृषी केंद्रवाल्याकडून खते, बी-बियाणे, औषधी उधार घेतली होती. आता ही देणी द्यायची कशी, असा प्रश्न शेतकर्याला आजरोजी पडला आहे. आज पडलेल्या पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये सोयाबीन पिकाची नासाडी झाली आहे. हे पीक शेतात सोगून पडलेले आहे, काहींची उभी आहे, त्यांच्या सोयाबीनला कोंबसुद्धा आलेले आहे, असे भयानक चित्र बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. आज सोयाबीन सोंगण्यासाठी मजूर नाही, सोयाबीनला भाव नाही, शेतकर्यांनी करायचे तरी काय, असा प्रश्न सर्वसामान्य शेतकर्याला पडला आहे.आज सोयाबीन साडेतीन ते चार हजार रुपये क्विंटल विकले जात आहे. त्यामध्ये कृषी केंद्रवाल्याची उधारीसुद्धा शेतकरी देऊ शकत नाही, अशी परिस्थितीत शेतकर्यांना एकही आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी वाली राहिलेला नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे एकवेळ येऊन गेले, त्यानंतर त्यांनी शेतकर्यांच्या परिस्थितीकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. आज जर शेतकर्यांना तातडीने मदत केली नाही तर जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. तेव्हा, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कोणत्याही प्रकारचे निकष न लावता, सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. जर शासनाने मदत केली नाही तर शेतकरी कोणत्याही मार्गावर जाऊ शकतो, अशा संतप्त प्रतिक्रिया काही शेतकर्यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’जवळ व्यक्त केल्या आहेत.
एकीकडे शेतकरी परतीच्या पावसाने आत्महत्येच्या तोंडावर नेवून ठेवला आहे, तर तिकडे महसूल विभाग आणि कृषी विभाग यांच्या श्रेयवादामुळे ऐन दिवाळीत शेतकर्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यांना अतिवृष्टीच्या नुकसानाची मदत अद्याप मिळाली नाही. जिल्ह्यात एक माजी मंत्री, शिंदे गटाचे आमदार-खासदार आहेत. पण, शेतकरी यांच्यासाठी कोणीही आवाज का उठवत नाही? अशा प्रश्न जिल्ह्यातील शेतकरी विचारत आहे.
(श्री एकनाथ माळेकर हे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या विदर्भ विभागाचे सहसंपादक आहेत. संपर्क – ९८८१५ ५२१०४)