अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; पालकमंत्र्यांचे बुलढाणा जिल्हाधिकार्यांना आदेश
– एकही शेतकरी नुकसानीच्या पंचनाम्यातून सुटणार नाही याची दक्षता घ्या!
बुलढाणा (एकनाथ माळेकर) – बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टी व परतीच्या पावसाने हाहाकार माजवून हाती आलेल्या नगदीच्या सोयाबीन पिकासह कापूस, उडीद या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी उद््ध्वस्त झाल्याबाबतचे सविस्तर वृत्त ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने काल प्रसारित केले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेत, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, नुकसानग्रस्त एकही शेतकरी पंचनाम्यातून सुटणार नाही, याची दक्षता घ्या, असे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. त्यानुसार, जिल्ह्याचा महसूल व कृषी विभाग कामाला लागला आहे.
बुलढाणा जिल्ह्यात १० व ११ ऑक्टोबररोजी सर्वदूर पाऊस झाला असून, मेहकर तालुक्यातील मेहकर मंडळात १०७ मिलीमीटर आणि नायगांव मंडळात १०७ मिलीमीटर तर लोणार तालुक्यातील सुलतानपूर मंडळात १०५ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. सदर अतिवृष्टीमुळे या दोन तालुक्यात अंदाजे १९ हजार ६५ हेक्टर आर शेतीपीकाचे नुकसान झाले आहे. तसेच, जिल्ह्यातील शेतकर्यांच्या दयनीय अवस्थेची व सोयाबीन पिकाच्या नासाडीची माहिती ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने सविस्तर प्रकाशित केली होती. त्यामुळे शेतकर्यांवर कोसळलेल्या अस्मानी संकटाची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचेकडून सविस्तर माहिती घेऊन नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. सदर पंचनामे करतांना नुकसानग्रस्त एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले. यावेळी मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर हेसुध्दा पालकमंत्र्यांसोबत होते. सद्यस्थितीत मेहकर आणि लोणार तालुक्यातील शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले असून, दहा ते बारा दिवसात पंचनामे पूर्ण करण्यात येऊन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनास अंतिम अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे महसूल यंत्रणेने सांगितले आहे. दिवाळीपूर्वी शासनाने शेतकर्यांना मदत दिली तर त्यांची दिवाळी गोड होण्याची शक्यता आहे.
————–