किनगावजट्टू, ता. लोणार (जयजीत आडे) – विजांच्या कडकडाटासह किनगावजट्टू परिसरासह शेजारच्या अकोला व वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसाने धुमाकूळ घातला आहे. सकाळपासून पावसाने हजेरी लावत शेतीपिकांची दाणादाण उडवली. या पावसाने नदी-नाल्यांना पूर आला आहे. पावसामुळे शेतकर्यांची चांगलीच दमछाक झाली असून, सोंगून ठेवलेले सोयाबीन भिजले असून, अनेक ठिकाणी सोयाबीनला कोंब येण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, कापसाला पात्या येणे सुरू झाले होते. या पावसामुळे पात्या गळून मोठे नुकसान होत आहे.
किनगावजट्टू परिसरात दुपारी दीड वाजता विजांच्या गडगडाटात पावसाला सुरुवात झाली. सोंगून ठेवलेले सोयाबीन काड शेतात पसरून ठेवले होते, ते भिजले आहे. तसेच सोयाबीनच्या गंज्यासुद्धा भिजल्या, ओढेनाले तुडुंब भरून वाहिले. शेतातसुध्दा पाणी मावेनासे झाले होते. अनेकांच्या सोयाबीनला कोंब आले आहेत. प्रशासनाच्यावतीने किगावजट्टू, देवानगर, वसंतनगर सा.तेली, खापरखेड, भुमराळा, बिबखेड येथे भेट देवून झालेल्या नुकसानीची पाहणी करावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. या पावसामुळे कापूस, सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन कापणीला आलेले आहे. शेंगा भरलेल्या आहे. आता ऊन तापल्यास शेंगा तडकून फुटतात. त्यामुळे दाणा मातीत पडून गुणवत्ता खराब होईल. उत्पादन कमी आणि भावही कमी अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे. बाजारात सोयाबीनला ३५०० रूपये क्विंटल भाव आहे. तर हमीभाव ४,२०० रूपये आहे. कापूस ८ हजार रूपये क्विंटलच्या खाली येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पावसाने शेतकरी अस्मानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडला आहे.
पावसामुळे कापूस पिकाची फुलासहीत बोंडे गळतील. परिणामी, कापूस फुटायला वेळ लागेल. शेतकर्यांना बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागेल. शेतात तण उगवेल. तण काढण्यासाठी निंदणाचा खर्चात वाढ होईल, अशी एकंदरीत परिस्थिती असल्याचे जाणकार शेतकर्यांनी सांगितले आहे.
शेजारच्या अकोला, वाशिम या जिल्ह्यांसह बुलढाणा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला असून, अकोला जिल््ह्यातील अनेक गावांत ढगफुटीसदृश पाऊस झाल्याची माहिती हाती आली आहे. विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा जोर जास्त आहे. अकोला जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये मुसळधार पाऊस झाला. मंगळवारी पहाटेपासून काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. सातपुडा पर्वतरांगाच्या पायथ्याशी असलेल्या भागात पावसाचा जोर अधिक होता. नदी-नाल्यांना पूर वाहले. हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. त्यामुळं शेतकऱ्यांनी पीककाढणीचं नियोजन हवामानाचा अंदाज घेऊनच करणं फायदेशीर ठरणार आहे.