शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ चिन्ह; अंधेरीत रंगणार ‘मशालविरुद्ध ढाल-तलवार’ सामना!
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) – मुंबईतील अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचे बंडखोर नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘ढाल-तलवार’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. काल निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह दिले होते. तर शिंदे गटाने दिलेली तिन्ही चिन्ह रद्द करत आज नवीन चिन्ह पाठवण्यास सांगितले होते. त्यानुसार, पाठवलेल्या पसंतीपैकी ढाल-तलवार हे चिन्ह मिळालेले आहे. यापूर्वी शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव मिळाले आहे. त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना बाळासाहेबांची हे पर्याय ठेवले होते त्यातील ‘बाळासाहेबांची शिवसेना’, हे नाव शिंदे गटाला देण्यात आले. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत आता मशालविरुद्ध ढाल-तलवार असा सामना रंगणार आहे. ढाल-तलवार चिन्ह मिळाल्याने शिंदे गटातील नेत्यांनी समाधान व्यक्त केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने निवडणूक चिन्हांसंदर्भात आज दोन स्वतंत्र ई-मेल निवडणूक आयोगाला पाठवले होते. दोन्ही ई-मेलमध्ये प्रत्येक तीन नवीन चिन्हांचा पर्याय सूचवल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये ढाल-तलवार, तळपता सूर्य आणि पिंपळाचं झाड, रिक्षा, शंख आणि तुतारी असे पर्याय देण्यात आले होते. शिंदे गटाला काय चिन्ह मिळणार याची उत्सुकता होती. परंतु, दोन तलावर आणि एक ढाल असे हे चिन्ह आयोगाने दिले आहे. मुळात शिंदे गटाने तळपता सूर्य हे चिन्ह पहिल्या पसंतीचे सांगितले होते. मात्र उगवता सूर्य आणि तळपता सूर्य यात गोंधळ होण्याची शक्यता होती. उगवता सूर्य हे डीएमके पक्षाच चिन्ह आहे. तर तळपता सूर्य हे मिझोरम पार्टीला देण्यात आलेले आहे. दरम्यान, ढाल-तलवार हे चिन्ह यापूर्वी पीपल्स डेमोक्रेटीक मुव्हमेंटला देण्यात आलेले होते. मात्र या पक्षाची नोंदणी २००४ मध्ये रद्द करण्यात आली होती. तेव्हापासून हे चिन्ह निवडणूक आयोगाच्या प्रâी सिम्बॉलच्या यादीत होते.
‘बाळासाहेबांची’ म्हणाल तर मला रॉयल्टी लागेल; थोरातांचा शिंदे गटाला टोमणा!
‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव शिंदे गटाच्या पक्षाला मिळालेले आहे. परंतु, बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे नक्की कोणाची? असे प्रश्न मिश्किलमध्ये विचारले जात आहेत. उद्धव ठाकरेंच्या गटाकडूनही या नावावरुन नक्की कोणाची शिवसेना? असा सवाल करण्यात आला आहे. आजच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणातही अनेक बाळासाहेब आहेत. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर असतील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात असतील, यावरुनच पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी मिश्किल कोटी केली आहे. ‘आता खरं म्हणजे बाळासाहेब थोरातांची शिवसेना म्हटलं तर मला त्यांच्याकडून फोटो लावला तर रॉयल्टी घ्यावी लागेल’ अशी कोटी थोरात यांनी केली. त्यांच्या या कोटीनंतर एकच हशा पिकला.
—————–