सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – विजांच्या गडगडाटासह झालेल्या जोरदार पावसाने सिंदखेडराजा तालुक्यातील देऊळगाव कोळ येथील खुशालराव उत्तमराव गायकवाड या शेतकर्याचा बळी घेतला आहे. ते त्यांच्या पत्नीसह शेतात काम करत असताना, अंगावर वीज पडून ते मृत्युमुखी पडले.
सिंदखेडराजा तालुक्यातील देऊळगाव कोळ येथील गटनंबर १३७, मांडवा शिवारात गायकवाड यांची शेती आहे. आज दुपारी पाच वाजेच्या सुमारास ते त्यांच्या पत्नीसह शेतात काम करत असताना, अचानक आकाशामध्ये ढग दाटून आले आणि काही वेळातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. विजांचा कडकडाटसह पाऊस सुरू झाल्याने, त्या पावसामध्येदेखील गायकवाड हे शेतात काम करत असताना, अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यांना तातडीने तेथील सहकार्याच्या मदतीने सरकारी दवाखाना बीबी येथे आणले असता, डॉ. धैर्यशील बुरूकुल यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेने देऊळगाव कोळ येथे हळहळ व्यक्त होत आहे.