सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – कृषीयोद्धा संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खरात पाटील यांचे वडिल देवीदास नामदेव खरात यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने ९ ऑक्टोबररोजी निधन झाले आहे. मृत्युसमयी त्यांचे वय ६७ वर्षे होते. ते परिसरातील उत्तम शेतकरी होते, व आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी शेतीमातीत व्यतित करून शेतीच्या समृद्धीसाठी वेचले. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.देविदास खरात पाटील हे हाडाचे शेतकरी होते, घरची परिस्थिती उत्तम होती. मोठ्या प्रमाणात शेती असतानाही शेतकर्याला मन मारून जगावे लागते, हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यांच्या मुलाला, ज्ञानेश्वर खरात पाटील यांना कृषी शाखेचे शिक्षण दिले, त्या माध्यमातून आज ज्ञानेश्वर खरात पाटील महाराष्ट्रभर शेतकर्यांच्या न्यायहक्कांसाठी लढत आहेत. शेतकर्यांना मार्गदर्शन करत आहेत. देविदास खरात पाटील यांनी संपूर्ण आयुष्य शेतीसाठी वेचले व सर्व काही सुरळीत असतांना त्यांची तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने प्राणजोत मावळली. त्यांच्या निधनाने हिवरा गडलिंग (ता. सिंदखेडराजा) परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम उद्या (दि.१२) हिवरा गडलिंग येथेच होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.
——————