बीड (जिल्हा प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाचे बीड शहराध्यक्ष तथा कट्टर गोपीनाथ मुंडे समर्थक भगीरथ बियाणी यांनी त्यांच्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.११) सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे बीड शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यांना तत्काळ शहरातील फिनिक्स रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांनी आत्महत्या का केली, याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. भगीरथ बियाणी यांच्या राहत्या घरीच ही घटना घडली. सकाळी 11 वाजेच्या सुमारास बंदुकीतून गोळी झाडण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात भगीरथ बियाणींचा मृतदेह आढळला. पोलिसांनी तत्काळ त्यांना शहरातील फिनिक्स रुग्णालयात दाखल केलं. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे आणि भाजपच्या पदाधिकार्यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली होती. बियाणी यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही. भगीरथ बियाणी यांनी सकाळी स्वतःवर गोळी झाडून घेतली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. सध्या बियाणी यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. या ठिकाणी नातेवाईकांसह भाजपच्या पदाधिकार्यांनी मोठ्या संख्यने गर्दी केली आहे. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक केतन राठोड यांनी धाव घेतली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. कौटुंबीक कारणातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता वर्तविली जात आहे. सध्या बियाणी यांचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. बियाणी यांची आत्महत्या आहे की हत्या याचा तपास आम्ही करत आहोत, अशी माहिती बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे. दरम्यान, पत्रकार, व्यापारी, महसूल, पोलीस अधिकारी तसेच राजकीय क्षेत्रात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असणारे भगीरथ बियाणी हे सामाजिक क्षेत्रात देखील अग्रेसर होते. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ते भाजपमध्ये गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत होते. मागील वर्षी त्यांची शहराध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
खा. प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे यांच्या अत्यंत निकटचे समजले जाणारे भगीरथ बियाणी यांच्या अशा एकाएकी निधनाने प्रीतम मुंडे यांना धक्का बसला. रुग्णालयात बियाणी यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी त्या पोहोचल्या. मात्र तेथील मृतदेह पाहूनच खा. प्रीतम यांना भोवळ आली. मुंडे यांचीही तत्काळ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. अत्यंत जवळचा आणि निष्ठावंत कार्यकर्ता असल्याने खा. प्रीतम मुंडे अस्वस्थ झाल्या. हे धक्कादायक चित्र पाहून खा. प्रीतम मुंडे यांना अश्रू अनावर झाले.
———–