वर्धा (विशेष प्रतिनिधी) – नागपूर ते अमरावती महामार्गावरील कारंजाजवळच्या पांडे पेट्रोलपंपाजवळच एसटी गाडीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार एका शेतकर्याचा जागीच तर दुसर्या शेतकर्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. हा अपघात काल, दि.१० दुपारी चार वाजताच्या दरम्यान झाला. मरण पावलेल्यात मेट हिरजी गावातील रामदास भलावी (वय ६५) आणि प्रल्हाद इवनाथे (वय ४५) यांचा समावेश आहे.रामदास भलावी, हे जागीच मरण पावले तर प्रल्हाद इवनाथे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन महामंंडळाची एमएच १३सीयू ८३३२ क्रमांकाची गाडी प्रवासी घेऊन शेगाव येथून कारंजा मार्गे ब्रह्मपुरीकडे जात होती. याचवेळी कारंजा शहरापासून सुमारे १ किलोमीटर अंतरावर असलेल्या पांडे पेट्रोलपंपाकडे पेट्रोल भरण्यास एमएच ३१/५७९८ क्रमांकाची दुचाकी वळली. या दुचाकीवर मेट हिरजी गावातील रहिवासी रामदास भलावी आणि प्रल्हाद इवनाथे होते. या दुचाकीला एसटी गाडीने जोरात धडक दिली. ही धडक येवढी जोरात होती की दुचाकी एसटी गाडीच्या खाली आली. तर धडकेने दुचाकीवरील दोघेही जोरात दूरवर फेकले गेले.
दोन्ही शेतकरी कारंजा पंचायत समितीत कृषी अधिकार्यांकडे संत्र्याच्या झाडाचे परमिट घेण्याकरीता दुचाकीने आले होते. काम आटोपल्यानंतर ते गावाकडे परत जायला निघाले होते. जाताना पेट्रोल भरण्याकरीता त्यांनी दुचाकी पेट्रोलपंपाकडे वळविली. त्यांच्याच दुचाकीच्या मागे एसटी गाडी होती. ही गाडी अचानक वळलेल्या एसटीवर धडकली. त्यामुळे हा अपघात झाला.या पेट्रोलपंपात पेट्रोल भरण्याकरीता दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने दुचाकी नेतात. याला पायबंद घालण्यास ओरिएंटल टोलप्लाझाच्या वतीने दगड लावले होते. पण काहींनी ते दगड बाजूला केले तसेच विरुद्ध दिशेने दुचाकीने जाणे सुरू केले होते. जाण्याकरीताचा शॉर्टकट निवडण्याच्या नादातच येथे सातत्याने अपघात होत आहेत. यापूर्वीही याच ठिकाणी दोन युवकांचा अपघाती मृत्यू झाला होता. पुढील तपास ठाणेदार दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सचिन मानकर, गुड्डू थूल, नितेश वैद्य करीत आहे.