लोकशाहीचा मुडदा पाडला; शिवसेनेने डागली तोफ!
– चिन्ह गोठवले गेल्याने शिवसेना संपणार नाही, ठाकरेंची ताकद वाढेल – शरद पवार
मुंबई (प्राची कुलकर्णी) – शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे दोन्ही केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर शिवसेनेने दैनिक सामनाच्या अग्रलेखातून निवडणूक आयोगावल जोरदार टीकास्त्र डागले आहे. हा लोकशाहीचा मुडदा पाडण्याचाच प्रकार असून, अंधेरी निवडणुकीसाठी आयोगाने केलेली ही मॅचफिक्सिंग असल्याची टीका या अग्रलेखातून करण्यात आली आहे. दरम्यान, चिन्ह गोठवल्यामुळे शिवसेना संपणार नाही. तिथली तरुण पिढी आणखी जोमाने उभी राहील आणि आपली शक्ती वाढवेल, असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण या दोन्हीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी दावे केल्यानंतर शनिवारी सायंकाळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकार्यांची बैठक झाली. ४ तासांपेक्षा अधिक वेळ चाललेल्या या बैठकीअंती शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे दोन्ही गोठवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. निवडणूक आयोगाचा हा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तसेच, आयोगाच्या या निर्णयाने महाराष्ट्रात संतापाची लाटदेखील उसळली असून, कधी नव्हे तेवढा एकनाथ शिंदे व बंडखोरांविषयी संताप व्यक्त होऊ लागला आहे. या सर्व घडामोडींवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, की ‘चिन्ह गोठवल्यामुळे शिवसेना संपणार नाही. तिथली तरुण पिढी आणखी जोमाने उभी राहील आणि आपली शक्ती वाढवेल,’ असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. तसेच, निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावरही पवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (ठाकरे गट) आहे. या निर्णयाचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, शिवसेना नेत्यांनी आयोगाच्या निर्णयावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. लोकशाहीचा एक महत्त्वाचा स्तंभ म्हणून त्याकडे पाहिले जाते. असे असताना आयोगाकडून हे संपूर्ण प्रकरण व्यवस्थित ऐकून घेतले गेले नाही. याबाबत बाजू मांडण्याची संधी आम्हाला दिली गेली नाही. त्यामुळेच आयोगाच्या निर्णयावर पुढे कोणते कायदेशीर पर्याय आहेत ते आम्ही पडताळत आहोत, असे शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी सांगितले. शिवसेनेतून बंडखोरी करणार्या ४० आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिका तसेच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या अनुषंगाने इतर याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. यावरील निर्णयाआधीच निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत काही विपरीत निर्णय दिला तर घड्याळाचे काटे उलटे फिरवता येणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करताना शिवसेनेने नमूद केले होते. आज तेच घडले आहे. आयोगाने आम्ही दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून निर्णय दिला असता तर ते योग्य ठरले असते, असे देसाई यांनी पुढे नमूद केले.
दरम्यान, काल, शनिवारी निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला. त्यानंतर आता निवडणूक आयोगाच्या आदेशाला ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तज्ज्ञासोबत चर्चा केल्यानंतर ठाकरे गट हा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे चिन्हाचा पेच आणखीनच वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले ‘हे’ आदेश
१. दोन गटांपैकी कोणीही शिवसेना हे नाव वापरू शकणार नाही.
२. दोन्ही गटांपैकी कोणालाही ‘धनुष्य आणि बाण’ हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.
३. दोन्ही गट त्यांच्यासाठी निवडतील अशा नावांनी ओळखले जातील.
४. संबंधित गट, त्यांना हवे असल्यास, त्यांच्या मूळ पक्षाशी जोडणारे चिन्ह निवडू शकतात.
५. दोन्ही गटांना ते निवडतील वेगवेगळी चिन्हे देखील दिली जातील. निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून निवड करावी लागेल.
६. सध्याच्या पोटनिवडणुकासाठी दोन्ही गटांना याद्वारे १० ऑक्टोबर २०२२ दुपारी एक वाजेपर्यंत सादर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
– (अ) त्यांच्या गटांच्या नावांना ज्याद्वारे आयोगा मान्यता देईल आणि त्यासाठी
– प्राधान्य क्रमाने तीन पर्याय द्या, त्यापैकी कोणीही असू शकतो.
(ब) उमेदवारांना जे चिन्ह वाटप केले जाऊ शकतात, जर असतील तर संबंधित गटामध्ये तीन मुक्त चिन्हांची नावे सूचित करू शकतात.
– त्यांच्या पसंतीचा क्रम, त्यापैकी कोणालाही त्यांच्या उमेदवारांना वाटप केले जाऊ शकते.
——————-