बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी) २६ वर्षीय विवाहितेवर अत्याचार करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या नराधमास पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सूरत येथील श्री दर्शन सोसायटी दिंडोली येथे राहणारी २६ वर्षीय विवाहिता चिखली तालुक्यातील सोनेवाडी येथे माहेरी आली होती. दरम्यान विवाहितेच्या आई-वडिलांना पोल्ट्री फार्मचे काम करायचे असल्याने त्यांची ओळख नितीन मनोहर शेळके याचे सोबत झाली.
नितीन शेळके हा आई-वडिलांच्या पोल्ट्री फार्मचे काम करून देणार असल्याने विवाहितेसोबत सुद्धा ओळख झाली होती. त्यामुळे विवाहिता व नितीन शेळके यांचे फोनवर पोल्ट्री फार्मच्या कामाबद्दल बोलणे सुरू असायचे. दरम्यान ४ जुलै २०२१ रोजी दुपारी १२ च्या सुमारास नितीन शेळके याने विवाहीतेला फोन करून सोनेवाडी शिवारातील शेतातील गोठ्याजवळ बोलावले. यावेळी नितीन शेळके यांने विवाहितेवर बळजबरीने लैंगिक अत्याचार करून मारहाण केली. त्यानंतर याबाबत कोणाला सांगितल्यास जिवे मारून टाकीन अशी धमकी देत २२ जानेवारी २०२२ पर्यंत वारंवार लैंगिक अत्याचार केला, अशी तक्रार २६ वर्ष पीडित विवाहितेने १६ जुलै रोजी रायपूर पोस्टेला दिली.
यावरून रायपूर पोलिसांनी नितीन शेळकेविरूध्द कलम ३७६ (१), ३७६ (२) (एन), ३२३, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. यावेळी पोलिसांनी गुन्हा दाखल करताच आरोपी नितीन शेळके यास अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास ठाणेदार राजवंत आठवले करीत आहेत.