शेतकर्यांची फसवणूक; रविकांत तुपकर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले
– रनमोडे व खान यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करून शेतकर्यांचे पैसे द्या!
– जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून कारवाईचे आश्वासन
चिखली (तालुका प्रतिनिधी) – शेतकर्यांचा शेतमाल खरेदी करून त्याचे पैसे न देता पळून जात, शेतकर्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा व्यापारी संतोष रनमोडे व वहीद खान यांच्याविरोधात पोलिस गुन्हे दाखल करून अटक करण्यास टाळाटाळ करत आहेत. याबाबत चिखली व अंढेरा पोलिस ठाण्यांत शेकडो पीडित शेतकर्यांनी अर्ज दिलेले आहेत. या तक्रारींवरून तातडीने गुन्हे दाखल करा व तात्काळ कारवाई कठोर कारवाई, या मागणीसाठी आज शेकडो अन्यायग्रस्त शेतकर्यांना घेवून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी एस.राममूर्ती यांचे दार ठोठावले व त्यांच्याकडे वैâफियत मांडली.
बुलडाणा जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातील व्यापारी संतोष रनमोडे व जिल्ह्यातील वहीद खान दिलावर खान या व्यापार्यांनी शेकडो सोयाबीन उत्पादक शेतकर्यांची अंदाजे ५० कोटी रुपयांनी फसवणूक केली आहे. या भामट्यांनी हजारों क्विंटल सोयाबीन शेतकर्यांकडून खरेदी करून घेतली, पण पैसे न देता फरार झाले आहेत. त्यामुळे फसवणूक झालेल्या अन्यायग्रस्त शेतकर्यांना घेवून आज शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय गाठले व जिल्हाधिकारी एस.राममूर्ती यांच्यासोबत चर्चा केली.
शेकडो शेतकर्यांनी तक्रारी देवूनही ‘त्या’ व्यापार्यांवर अद्याप कारवाई झाली नाही. ‘त्या’ व्यापार्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी व त्यांची संपत्ती जप्त करून शेतकर्यांच्या घामाचे पैसे तात्काळ काढून देण्यात यावे, अशी आग्रही मागणी केली. यावर जिल्हाधिकारी यांनी पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांच्यासोबत चर्चा केली व अन्यायग्रस्त शेतकर्यांना न्याय मिळवून देवू असे आश्वासन दिले. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासोबत रविकांत तुपकर यांनीही स्वतः फोनवरून सविस्तर चर्चा केली. पोलिस अधीक्षकांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे.
माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की, कोणत्याही व्यापार्यांसोबत व्यवहार करतांना आंधळा विश्वास ठेवू नका. जास्त भाव मिळण्याच्या आमिषापोटी सोयाबीन उधारीत, आश्वासनावावर विकू नका. व्यवहार करतांना दलालांवर विश्वास न ठेवता नगद व रोखीनेच व्यवहार करावा.
– रविकांत तुपकर, शेतकरी संघटना नेते
—————–