मेहकर (तालुका प्रतिनिधी) – गरबा खेळत असताना रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ४७ वर्षीय हॉटेल व्यावसायिकांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. विशाल पडधारिया (वय ४७) असे व्यावसायिकांचे नाव आहे. या आकस्मिक घटनेमुळे क्षणभरातच गरबास्थळावर शोककळा पसरली. जानेफळ येथे ही दुर्देवी घटना घडली. स्थानिक व्यावसायिकांनी आज, सोमवारी स्थानिक बाजारपेठ बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
जानेफळ येथील पडधरिया कुटुंब गेल्या काही वर्षांपासून आपल्या घरासमोर नवरात्रामध्ये देवी बसवतात. यंदाही त्यांनी देवी बसवली होती. रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास देवीसमोर दांडिया खेळत असलेले विशाल पडधरिया हे अचानक जमिनीवर कोसळले, भोवळ आल्याचे समजून त्यांना तातडीने खासगी दवाखान्यात डॉ. केशव अवचार यांच्याकडे नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सोमवारी व्यापार्यांनी आपले दुकाने बंद ठेवून त्यांना आदरांजली अर्पण केली.
मूळचे गुजरात राज्याचे निवासी विशाल पडधारिया उर्फ बाबूभैय्या यांना गायनाचा व पारंपरिक वाद्ये वाजवण्याचा छंद होता. गेल्या २५ वर्षापासून नवरात्रीत देवीची स्थापना करून त्यांनी अनेकांना गरबा-दांडिया हा खेळ प्रकार शिकवला. रविवारी रात्री गावातील वीर सावरकर दुर्गा मंडळासमोर ते गरबा खेळत होते. यावेळी विशाल यांना अचानक भोवळ आली. गरबास्थळावरील अन्य उपस्थितांनी त्यांना तातडीने रूग्णालयात हलवले. मात्र, वैद्यकीय तपासणीत डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे.