वणी-आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : शारदीय नवरात्रीचे आठव्या माळेस अर्थात शारदीय नवरात्रीच्या आठव्या दिवशी, देवीचे आठवे रूप महागौरीची पूजा केली जाते. नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा माता भगवती सप्तशृंगी गडावर वणी देवस्थानचे वतीने परंपरेने केली जाते. नवरात्रीच्या आठव्या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी कन्यापूजाही केली जाते. महागौरीने श्वेत रंगाचे वस्त्र आणि दागिने परिधान केले आहेत. तिला चार हात आहेत आणि बैल तिचे वाहन आहे. महागौरी हे देवी पार्वतीचेच एक रूप आहे. पौराणिक कथेनुसार, पार्वतीने भगवान महादेवांची कठोर तपस्या केल्यानंतर त्यांना पती म्हणून प्राप्त केले होते. महागौरीच्या उपासनेने साधकाला धन, वैभव, सुख-समृद्धी प्राप्त होते. महागौरीला प्रसन्न करण्यासाठी सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्रयंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा जप केला जातो.
आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे नवरात्रोत्सवाच्या संबोधल्या जाणाऱ्या सप्तशृंगीदेवीचा शारदीय नवरात्रोत्सवात सोमवारी ( दि. ३ ) दुर्गाअष्टमी निमित्त देवीच्या सुवर्ण अलंकाराची विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालयातून शेकडों भाविकांचे उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली. शारदीय नवरात्रीच्या आठव्या (अष्टमी) दिवशी सुमारे २५ हजारावर भाविकांनी भक्तिमय वातावरणात देवीचे दर्शन घेत श्री सप्तशृंगी देवीच्या चरणी नतमस्तक झाले. यावेळी श्री सप्तशृंग देवीची पंचामृत महापूजा ही कॅट (CAT) भारत सरकारचे अध्यक्ष तथा उच्च न्यायालयाचें सन्मानीय न्यायमूर्ती रणजित मोरे व उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी सपत्नीक केली. तसेच श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्र, दिंडोरीचे प्रणेते गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे, महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी महानैवेद्य आरती केली. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड चे विश्वरत तथा कळवण तहसीलदार बंडू कापसे, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा न्यायालय, नाशिक येथील राजशिष्टाचार अधिकारी नितीन आरोटे, विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापन व प्रशासन प्रतिनिधी आदी उपस्थिती होते. अष्टमीच्या दिवशी नियोजित असलेला पालखी सोहळा अर्थात श्री भगवती पालखीची विधिवत पूजन देणगीदार भाविक अॅड अखिलेश नाईक व कुटुंबीय यांनी पूजा करुन नगर प्रदक्षिणा करण्यात आली.
श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या प्रसादालयात सुमारे ७.५ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भाविकांना सुरक्षित दर्शन घेण्यासाठी ट्रस्टच्या मार्फत सुलभ व्यवस्था करण्यात आली आहे. नवरात्र उत्सव दरम्यान विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापन व प्रशासन प्रतिनिधी, कर्मचारी व पुजारी वृंद, स्थानिक ग्रामस्थ यांसह जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांनी विशेष परिश्रम घेतले.