– किन्होळा शासकीय रुग्णालयातील गैरसोयीचा वाचला पाढा
चिखली (शहर प्रतिनिधी) – किन्होळा येथील शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. साळोक यांची तातडीने येथून बदली करण्यात यावी, व या रुग्णालयास तातडीने सोयीसुविधा पुरवण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निवेदनाद्वारे जिल्हा आरोग्य अधिकार्यांकडे करण्यात आलेली आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या रुग्णालयातील गैरसोयींचा पाढाच वाचला. त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन आरोग्य अधिकारी यांनी दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे किन्होळा शाखेचे अध्यक्ष समाधान वानखेडे, देऊळगावराजा येथील कार्यकर्ते राजूभाऊ पठाण, किन्होळा येथील पक्षाचे सदस्य संजय वानखेडे, संदीप वानखेडे, गौतम जाधव, प्रकाश वानखेडे, बादल जाधव, वैभव लहाने आदी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आज बुलढाणा येथे जावून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत पाटील यांची भेट घेतली. किन्होळाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साळोक यांची तातडीने बदली करण्यात यावी, त्यांच्या जागेवर नवीन वैद्यकीय अधिकारी द्यावा, व नवीन येणार्या वैद्यकीय अधिकार्याने मुख्यालयी राहणे सक्तीचे करावे, रात्रपाळीसाठी डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत, रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या आहेत. तसेच, या रुग्णालयातील गैरसोयींचा पाढाही राष्ट्रवादीच्या या शिष्टमंडळाने आरोग्य अधिकार्यांपुढे वाचून, ग्रामस्थांच्या भावनांबाबत त्यांना अवगत केले.
————————