Breaking newsHead linesMarathwada

कुणाला येऊ नये असे मरण आले; बाभुळगावच्या तरुणाचा लिंगेवाडीत मळणीयंत्रात अडकून दुर्देवी मृत्यू

भोकरदन (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील लिंगेवाडी गावात मळणी यंत्रात अडकून ३५ वर्षीय तरुणाचा अत्यंत दुर्देवी मृत्यू झाला. आज सकाळी १० वाजेच्या सुमारास ही भयावह घटना घडली. संदीप सुधाकर गाडे (वय ३५, रा. बाभुळगाव) असे मृतकाचे नाव आहे. शेतामध्ये सोयाबीनची मळणी करत असताना तांत्रिक बिघाड झाल्याने, तो पाहण्यासाठी ते मळणी यंत्रात डोकावले, आणि क्षणात त्यांचा हात मळणी यंत्रणाने ओढला, व काही वेळातच त्यांनाही मळणी यंत्राने ओढून घेतले. या दुर्घटनेत मळणी यंत्र बंद करेपर्यंत गंभीररित्या जखमी झालेल्या संदीप यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती भोकरदन पोलिसांना मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह मळणी यंत्रातून बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला होता. शवपरीक्षणानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, या घटनेमुळे बाभुळगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

सद्या शेतातील सोयाबीन आणि काढणे काम सुरू आहे. संदीप गाडे यांच्याकडे स्वतःचे मळणी यंत्र आहे. ते गावातील तसेच बाहेर गावातीलसुद्धा व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी मळणी यंत्र घेऊन जात होते. ते आज मळणी यंत्र घेऊन लिंगेवाडी येथे गेले होते. तेथील शेतकरी सदाशिव साबळे यांच्या शेतात मळणी यंत्र सुरू असताना, मळणी यंत्रामध्ये अचानक तांत्रिक अडचण आल्यामुळे संदीप गाडे हे यंत्रामध्ये काय झाले हे पाहत असताना, त्यांचा अचानक हात मळणी यंत्रामध्ये गेला. त्यावेळेसच मळणी यंत्रात त्यांच्या धडापासून हात वेगळा झाला होता. मळणी यंत्र बंद करण्याचा प्रयत्नसुद्धा इतर मजुराने केला होता. परंतु मळणी यंत्राचा स्पीड एवढा होता की संदीप गाडे हे पूर्णपणे मळणी यंत्रात ओढले गेले. त्यात त्यांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेची भोकरदनचे पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांना मिळताच, त्यांनी घटनास्थळी पोलीस पाठवले. तोपर्यंत संदीप गाडे हे मळणी यंत्रामध्येच अडकलेले होते आणि त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होता. या तरुणाच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, आई, वडील असा बराच मोठा परिवार आहे. संदीप घरातील एकुलता एक कमावता तरुण असल्यामुळे गाडे कुटुंबावर खूप मोठे संकट कोसळले आहे.


चोरांनी चोरल्या होत्या संपूर्ण बकर्‍या

संदीप गाडे हे कष्टाळू होते. त्यांनी बकरी पालनाचा व्यवसाय सुरु केला होता. परंतु, काही दिवसांपूर्वीच त्यांच्या संपूर्ण बकर्‍या चोरांनी चोरून नेल्या होत्या. या घटनेने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले होते. परंतु, त्यात खचून न जाता, त्यांनी आपल्या ट्रॅक्टरसाठी मळणी यंत्र घेतले व ट्रॅक्टरला ते जोडून ते परिसरातील शेतकर्‍यांची सोयाबीन काढून देत होते. आज कुणालाही येऊ नये, असे दुर्देवी मरण त्यांना आल्याने भाबुळगाव येथे तीव्र शोकलहर पसरली होती. गावकर्‍यांना अन्नाचा कण गोड लागला नाही. त्याच्या कुटुंबीयांचा हंबरडा तर हृदयाला पीळ पाडत होता.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!