– सायबर पोलिसांत तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरू
चिखली (एकनाथ माळेकर) – एसबीआय बँकेतून बोलतो आहे, तुमचे किसान कार्ड रिन्यू करायचे आहे. तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो सांगा. असे एका सायबर भामट्याने बोरगाव काकडे येथील माजी सैनिक अशोक सखाराम खांजोडे यांना फोन वरून सांगितले. थोड्या वेळात मोबाईलवर आलेला ओटीपी खांजोडे यांनी त्या सायबर भामट्याला सांगितला आणि त्यांच्या खात्यातून तब्बल ४९ हजार ४१२ रुपये गायब झाले. बँका, सरकार वारंवार आपला ओटीपी, कार्ड पिन क्रमांक कुणाला सांगू नका, असे सांगत असतानाही माजी सैनिकाने आपला ओटीपी सांगण्याची चूक केली आणि त्यांना ४९ हजार रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. या घटनेबाबत सायबर पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. या घटनेने शेतकरीवर्गात एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर असे, की चिखली तालुक्यातील बोरगाव काकडे येथील माजी सैनिक अशोक सखाराम खांजोडे यांना एसबीआय बँकेच्या नावाने मेसेज आला की आपल्या खात्यामधून ४९ हजार ४१२ रुपये डिलीट झाले आहे, अशी माहिती किसान क्रेडिट धारक अशोक सखाराम खांझोडे यांना आपल्या मोबाईलवर मेसेज द्वारे मिळाली. त्यांनी लगेच एसबीआय बँक गाठून बँक मॅनेजर यांच्याशी चर्चा केली असता, तुमचे पैसे पे यु अॅप रेफर नंबर २७०८२०२२१४३८३४२७६३६ या नंबर वरून रेफर झाले आहेत. सदर रक्कम ही शेतकर्यासाठी शासनाने क्रेडिट म्हणून किसान क्रेडिट कार्ड दिले आहे, त्यामध्ये शासनाने शेतकर्यांसाठी अडचणीच्या काळात शेतकर्यांच्या किसान क्रेडिट खात्यात जमा केली होती. सदर रक्कम शेतकरी खते, बीबियाणे, औषधी आणण्यासाठी या रकमेचा वापर करतात. परंतु माजी सैनिक अशोक सखाराम खांजोडे यांना एका फोन वरून फोन आला व मी एसबीआय बँकेमधून बोलत आहे, मला तुमचे कार्ड रिन्यूअल करायचे आहे, तुमच्या मोबाईलवर जो ओटीपी आला तो मला सांगा, असा फोन केला व दोन मिनिटात ओटीपी आला व माजी सैनिक अशोक सखाराम खांजोडे यांनी आपल्या मोबाईलवरील ओटीपी दिला. यानंतर २५ सप्टेंबर या दिवशी त्यांच्या मोबाईलवर आपल्या किसान क्रेडिट खात्यातून ४९ हजार ४१२ रुपये डिबीट झाले आहे, असा मेसेज आला. हे माजी सैनिक एसबीआय बँकेत आले असता, आपल्या खात्यातून २५ ऑगस्ट रोजी पैसे वर्ग झाले आहे, असे सांगितले. त्यानंतर माजी सैनिकाच्या पायाखालची वाळू सरकून त्यांनी चिखली पोलीस स्टेशन गाठले. चिखली पोलीस स्टेशनने सदर गुन्हा सायबर क्राईमचा असून, तुम्ही बुलढाणा येथे तक्रार करा, अशी माहिती दिली. बुलढाणा येथे फोनवरून चौकशी केली असता तुम्ही अमडापूर पोलीस स्टेशनला तक्रार द्या, अशी माहिती सायबर शाखा बुलढाणा येथून माजी सैनिक अशोक सखाराम खांजोडे यांना देण्यात आली. या आधी माजी सैनिक अशोक सखाराम खांजोडे यांनी या किसन कार्ड मधून २८ हजार रुपये काढले होते. व्याजासह त्यांनी चाळीस हजार रुपये एसबीआय बँक मध्ये जमा केले होते. सदर शेतकरी निसर्गाच्या आसमानी आणि सुलतानी संकटात सापडला असतानाच आज आणखी एका संकटाचा बळी ठरला आहे.