– पवार कुटुंबीय म्हणजे अख्खा महाराष्ट्र नाही, सुप्रिया सुळेंना टोला
सोलापूर (हेमंत चौधरी) – देहू येथील कार्यक्रमात अजित पवारांना बोलू दिले नाही म्हणून महाराष्ट्राचा अपमान झाला, असे सुप्रिया सुळे म्हणतात. पवार कुटुंब म्हणजे अख्खा महाराष्ट्र आहे का? असा सवाल करत, विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेतली कारण, मतांची बेरीज जमत नव्हती. पण, मला खात्री आहे, की भाजप मला वार्यावर सोडणार नाही, असे प्रतिपादन रयत शेतकरी क्रांती संघटनेचे नेते तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
पंचायतराज समितीच्या दौर्यानिमित्त सदाभाऊ खोत हे सोलापूर येथे आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी चर्चा करताना ते बोलत होते. विधानपरिषद निवडणुकीतील माघारीविषयी ते म्हणाले, की निवडून न येण्यामुळेच आपण माघार घेतली आहे. परंतु, मला भाजप वार्यावर सोडणार नाही याची खात्री आहे. निवडणुकीत भाजप सहावी जागा जिंकणे कठीण होते. मतांची बेरीज होत नव्हती, म्हणून मी देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार माघार घेतली, असे सदाभाऊंनी सांगितले.
भविष्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार येणे अपेक्षित आहे. त्यावेळी हे माझा नक्की विचार करतील, मला ते वार्यावर सोडणार नाही, असा विश्वास मला आहे, असे सांगून, देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलू दिले. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र बोलू दिले गेले नाही, हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. त्यावर भाष्य करताना खोत यांनी पवार कुटुंबीय म्हणजे महाराष्ट्र नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. एकीकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत असताना तो महाराष्ट्राचा अपमान नाही का?, असा सवालही त्यांनी केला. यावेळी त्यांनी पवार कुटुंबीयांसह शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावरही टीकास्त्र सोडले.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना राष्ट्रपती करण्याची सूचना केली आहे. पवार यांनी अर्थात राष्ट्रपतिपदाचा आपण उमेदवार नाही, असे स्पष्ट केले आहे. खरे तर संजय राऊत यांनी शरद पवार यांचे नाव अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठी सुचवायला हवे होते.
– सदाभाऊ खोत