Breaking newsBULDHANAHead linesMaharashtra

एनआयए, एटीएसचे बुलढाणा, औरंगाबाद, जालन्यात छापे!

– बुलढाण्यातून दोघे उचलले, औरंगाबादेतून १३ ते १४ जण ताब्यात

औरंगाबाद/बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेभोवती एनआयए, ईडी व स्थानिक एटीएसने आज पुन्हा एकदा फास आवळला असून, राज्यात औरंगाबाद, मालेगाव, नांदेड, जालना, बुलढाणा, सोलापूर, नगरमध्ये भल्या पहाटेच छापे टाकून अनेकांना ताब्यात घेतले आहे. देशभरातदेखील छापे सुरुच होते. बुलढाणा येथे दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, नगरमधून दोघांना उचलले होते. औरंगाबादमध्ये तर रात्रभर छापेमारी करून १३ ते १४ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. बुलढाण्यात दोघांची कसून चौकशी सुरु असताना, त्यांच्या समर्थकांनी पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. तसेच, निदर्शने करणार्‍या सुमारे ११ जणांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. राज्यभरात 40 जणांना ताब्यात घेण्यात आले असून, ते सर्व पीएफआयच्या दुसर्‍या व तिसर्‍या फळीतील पदाधिकारी कार्यकर्ते असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून हाती आली आहे.

राज्य दहशतवादविरोधी पथक, ईडी आणि एएनआय यांनी संयुक्तपणे काल मध्यरात्रीनंतर पुन्हा एकदा पीएफआय संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर छापे टाकले असून, त्यांची धरपकड केली आहे. त्यांची आज दिवसभर कसून चौकशी सुरु होती. लवकरच त्यांच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. बुलढाण्यात अनेकांची चौकशी केल्यानंतर दोघांना एटीएसने ताब्यात घेतले होते. त्यांच्या सुटकेसाठी त्यांच्या समर्थकांनी बुलढाणा पोलिस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली होती. परंतु, पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून ही गर्दी हुसकावून लावली. दुसरीकडे, पुणे पोलिसांनी कोंढवा परिसरातून ६ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पुण्यात झालेली घोषणाबाजी आणि एनआयएच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर चौकशी सुरू होती. सोलापूरमधून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला एनआयएने दिल्लीला घेऊन गेल्याची माहिती आहे.

औरंगाबादमध्ये एटीएस आणि औरंगाबाद पोलिसांनी मोठी कारवाई करताना पीएफआयच्या आणखी १३ ते १४ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. औरंगाबाद पोलीस आणि एटीएसची रात्रभर छापेमारी करत ही कारवाई केली आहे. त्यात पीएफआय संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष शेख नासेंर शेख साबेर उर्फ नदवी (वय ३७ रा.बायजीपुरा, औरंगाबाद) सह शेख इरफान शेख सलीम उर्फ मौलाना इरफान मिल्ली, सय्यद फैजलं सय्यद खालील, परवेज खान मुजमिल खान, अब्दुल हादी अब्दुल रौफ या पाच जणांना अटक केली होती. त्याच प्रश्वभूमीवर औरंगाबाद एटीएस आणि गुन्हेशाखा पथकाने सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात कारवाईला सुरुवात केली होती. ही कारवाई आज पहाटेपर्यंत सुरू होती. या कारवाई औरंगाबाद एटीएस विभागाच्या कार्यक्षेत्रातील एकूण १८ ते २० जणांना पोलिसांनी तब्यात घेतले, असल्याची माहिती समोर येत आहे. यातील तब्बल १३ जणांना हे औरंगाबदेतील आहेत.  कल्याणमधील पीएफआय कार्यकर्ता फरदीन पैकरला कल्याणच्या बाजारपेठ पोलिस आणि ठाणे खंडणीविरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतले आहे. फरदीन कल्याणमधील रोहिदास वाडा परिसरातील आहे. पहाटेच्या सुमारास फरदीनला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

जालन्यामध्ये पीएफआयचा माजी जिल्हाध्यक्षाला ताब्यात घेतले आहे. स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली. आज पहाटे चंदनजीरा पोलिसांनी कन्हैयानगर भागातून या माजी जिल्हाध्यक्षाला ताब्यात घेतले. तसेच, अन्य एक कार्यकर्ताही ताब्यात घेण्यात आला आहे. नांदेड येथील आबेद अली मोहंमद अली खानला ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्या सात वर्षांपासून तो पीएफआयचा पूर्णवेळ सदस्य आहे. विविध ठिकाणी आंदोलन करून प्रक्षोभक भाषणे त्याने दिलेली आहे. एनआयएने स्थानिक पोलिसांच्या सहाय्याने अहमदनगर जिल्ह्यातील दोघांना ताब्यात घेतले आहे. नगर शहरातून आणि संगमनेरमधून प्रत्येकी एकाला ताब्यात घेण्यात आले. झुबेर अब्दुल सत्तार शेख (रा. अहमदनगर) आणि मौलाना खलिफ दिलावर शेख (रा. संगमनेर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

एनआयएने मागील आठवड्यात महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि राजधानी दिल्लीसह ११ राज्यांमध्ये छापासत्र राबवले होते. यात विविध राज्यातून १०६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकात सर्वाधिक कार्यकत्यांना अटक झाली होती. आतादेखील एनआयएने स्थानिक पोलिस, एटीएसच्या सहाय्याने छापे टाकून राज्यभर अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरु होती. चौकशीअंती त्यांना अटक केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!