– आता रेशनकार्डही अपलोड करावे लागणार
– लवकरच मिळणार बारावा हप्ता, प्रक्रिया सुरू
चिखली/मुंबई (एकनाथ माळेकर) – केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची महत्वकांक्षी योजना असलेल्या पीएम-किसान सन्माननिधी योजनेत महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या योजनेतील ज्या शेतकर्यांनी इ-केवायसी केली आहे, त्यांनाच पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे. पैसे पाठवण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आली असली तरी, अद्यापही बहुतांश शेतकर्यांची ई-केवायसी बाकी आहे. या योजनेतील घोटाळे थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
आतापर्यंत शेतकर्यांच्या खात्यावर ११ हप्ते जमा झाले आहेत. आता शेतकरी १२ व्या हप्त्याची प्रतीक्षा करीत आहेत. सरकार शेतकर्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे नियोजन करत आहे. माहितीनुसार, लवकरच ही रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्रातील मोदी सरकार शेतकर्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत करते. या योजनेद्वारे दिलेली आर्थिक मदत सरकारकडून शेतकर्यांच्या खात्यात वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये वर्ग केली जाते, परंतु आता या योजनेच्या नोंदणीच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. आता सर्व शेतकर्यांना नोंदणी करताना त्यांच्या शिधापत्रिकेची माहितीही द्यावी लागणार आहे. नवीन नियमांनुसार, आता नोंदणीच्या (रजिस्ट्रेशन) दरम्यान रेशन कार्डशी संबंधित सर्व माहिती देणे आवश्यक केले आहे. नोंदणी करताना रेशन कार्डही अपलोड करावे लागेल. अन्यथा, पुढील हप्त्याची रक्कम मिळणार नाही.
आतापर्यंत पीएम किसान योजनेचा लाभ तब्बल १० कोटी शेतकर्यांनी घेतला. परंतु जे अपात्र आहेत असे शेतकरी लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले असून, त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे १२ व्या हप्त्यासाठी लाभार्थी शेतकर्यांच्या संख्या कमी दिसणार आहे. अल्पभूधारक आणि गरजवंत शेतकर्य़ांनाच योजनेचा लाभ मिळावा, यासाठी ई-केवायसी हे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या शेतकर्यांनी ई-केवायसी केले, त्यांच्याच खात्यावर १२ व्या हप्त्याची रक्कम जमा होईल.
शेतकर्यांसाठी TOLL FREE क्रमांक उपलब्ध
पीएम किसान योजनेअंतर्गत, तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची पीडीएफ प्रत पोर्टलवर (PM Kisan Portal) अपलोड करावी लागेल. यासोबतच आधार कार्ड, बँक पासबुक आदींच्या हार्ड कॉपी जमा करण्याची अटही काढून टाकण्यात आली आहे. यानंतर तुम्हाला रेशन कार्ड आणि ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल. जर तुम्ही केवायसी केले नसेल, तर ते लवकरात लवकर पूर्ण करा. केंद्र सरकारने शेतकर्यांना काही अडचण आल्यास Toll Free क्रमांकही दिला आहे. १५५२६१, १८००११५५२६ किंवा ०११-२३३८१०९२ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. तर pmkisan-ict@gov.in यावर देखील मेल करू शकता.
—————