Breaking newsHead linesMaharashtra

पोरांनो, तयारीला लागा, राज्यात २० हजार पोलिस भरती!

– ८ हजारांची जाहिरात सुटली, आणखी १२ हजार पदासांठी जाहिरात सुटणार

मुंबई (प्राची कुलकर्णी) – राज्यातील हजारो तरूण गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिस भरतीच्या प्रतीक्षेत होते. काही दिवसांपूर्वी स्वत: उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या तरुणांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. सरकारने तत्काळ रिक्त पदांची भरती करावी, अशी मागणी करत नांदेड येथे तरुणांनी फडणवीस यांना घेराव घातला होता. तरुणाईच्या या मागणीची दखल राज्य सरकारने घेतली असून, राज्यात पोलिस विभागात २० हजार पदांची भरती करणार असल्याची मोठी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याचबरोबर तुरुंग विभागात अमुलाग्र बदल करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली.

फडणवीस म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन आम्ही पोलीस भरतीचा निर्णय घेतला असून, दोन वर्षांची भरती प्रक्रिया लवकरच हातात घेत आहोत. पोलिसांची सुमारे २० हजार पदे भरण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. ८ हजार पोलिसांच्या भरतीची एक जाहिरात यापूर्वी निघाली आहे, पुढे आणखी १२ हजार पोलिसांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल. यामुळे पोलिस दलाला मोठा फायदा होईल, असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच, कारागृहात अमूलाग्र बदल करण्याचे सूतोवाचदेखील त्यांनी केले. रेट ऑफ कन्व्हिक्शन वाढले पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे. तो वाढवण्याच्या दृष्टीने काय उपायोजना करता येतील तसेच जेल विभागात सुधारणा करणे गरजेचं आहे. सध्या आपल्या जेलमध्ये १,६४१ कैदी असे आहेत ज्यांना जामीन मिळालेला आहे पण जामिनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे आणि व्यक्ती नसल्याने ते तुरुंगातच आहेत. अशा लोकांना जी काही कायदेशीर मदत करता येईल? त्यांना बाहेर कसे काढता येईल? त्यासाठी एनजीओंची मदत घेण्याचा विचार सुरु आहे, असेही फडणवीसांनी सांगितले. तसेच सायबर सिक्युरिटीबाबत मी आढावा घेतला असून याबाबतचे सायबर सिक्युरिटीचे इन्प्रâास्ट्रक्चर उभा करण्याचा मानस आहे. फिशिंगमुळे लोकांना विविध फसवणुकींना सामोर जावे लागते, त्यामुळं सायबर सिक्युरिटीसाठी मोठे कॅम्पेनही आम्ही हाती घेणार आहोत, असेही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या विविध घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात होता. या पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गृहखात्याची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा झाल्यानंतर फडणवीस यांनी पोलिस दलाला सूचना दिल्या आहेत. ‘तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हे सिद्ध होण्याचा दर वाढला पाहिजे, असा आमचा प्रयत्न असणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. मंत्रालयात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीची नोंद ठेवा. राज्यभरात सीसीटीव्हींची संख्या वाढवा, अशा सूचनाही फडणवीस यांनी पोलिसांना दिल्या आहेत.

फडणवीस यांनी यावेळी फॉक्सकॉनच्या प्रकल्पावरून महाविकास आघाडीवर टीका केली. ‘संबंधित कंपनीला महाविकास आघाडीच्या सरकारने प्रकल्पासाठी जागा दाखवली नव्हती. शिवाय, एकही कॅबिनेटची बैठकदेखील घेण्यात आली नव्हती. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही त्यांना आवश्यक असणारी जागा दाखवली होती. हा प्रकल्प गुजरातला जातोय असे समजल्यानंतर आम्ही कॅबिनेटची बैठक घेतली आणि गुजरातपेक्षा जास्त सुविधा देत असल्याचे त्यांना सांगितले. कॅबिनेटीमधून मंजूर केलेले पॅकेजदेखील आम्ही त्यांना दाखवले. महाविकास आघाडीच्या काळात वेदांत प्रकल्पाबाबत काहीच झाले नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी केला आहे.


नवरात्रीमध्ये दोन दिवस मध्यरात्री बारापर्यंत दांडिया खेळण्याची परवानगी

नवरात्रीमध्ये दोन दिवस मध्यरात्री बारापर्यंत दांडिया खेळण्याची परवानगी देण्यात येणार आहे. तिसर्‍या दिवशीदेखील मध्यरात्री १२ वाजेपर्यंत परवानगी देण्याचाही प्रयत्न करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत याबात चर्चा झाली आहे. लवकरच याबाबतदेखील निर्णय घेऊ, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!