– लिंपी रोगाचे कोलारा सर्कलमध्ये थैमान, शेतकरी धास्तावले
चिखली (एकनाथ माळेकर) – चिखली तालुक्यातील भालगाव येथे लिंपी रोगाने ग्रस्त असलेल्या गाईचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. भालगाव हे गाव कोलारा सर्कलमध्ये येत असून, लिंपी आजाराने या सर्कलमध्ये घेतलेला हा चौथा बळी आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग धास्तावला असून, कोलारा सर्कलमध्ये लिंपी आजाराने थैमान घातले आहे. विशेष धक्कादायक बाब अशी की, या सर्कलमध्ये लिंपी रोगाचे थैमान सुरु असताना, फक्त एकच पशुवैद्यकीय अधिकारी दहा गावांना सेवा देत आहेत. त्यामुळे शासनाने या सर्कलसाठी तातडीने सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी देण्याची मागणी ऐरणीवर आली आहे.
सविस्तर असे, की चिखली तालुक्यातील भालगाव येथील पवनसिंह श्यामसिंह ठाकूर यांच्या गायीचा आज सकाळी सात वाजता लिंपी रोगाच्या आजारामुळे मृत्यू झाला आहे. पवनसिंह ठाकूर यांच्याकडे तीन गाई असून, पैकी एका गाईचा मृत्यू झाला. या गाईची दीड महिन्या अगोदर डिलिव्हरी झाली होती, दीड महिन्याचे वासरू आहे. त्यामुळे गाईच्या मृत्यूने पवनसिंह यांच्यावर मोठे संकट ओढावले आहे. आज शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळाला आहे. परंतु लिंपी रोगामुळे आज शेतकरी हतबल झाला आहे. या घटनेसंदर्भात ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने कोलारा सर्कलचे वैद्यकीय अधिकारी पूनम तायडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की कोलरा सर्कलमध्ये दहा गावे येत असून, आज सकाळपासून मी भालगाव मध्येच आहे. सर्व जनावरांवर उपचार सुरू आहेत. सदर गाईच्या पोटावर गाठी दिसून येत असल्यामुळे सदर गाईचा मृत्यू हा लिंपी रोगामुळे झाला आहे. या अगोदरसुद्धा कोलरा सर्कलमध्ये तीन जनावरे लिंपी रोगामुळे दगावली आहेत. आज गाईचा झालेला मृत्यू हा चौथा आहे. या सर्कलमध्ये दहा गावे येत असून, मी एकटीच काम करत आहे. जोपर्यंत लिंपी रोगाचा प्रादुर्भाव आहे, तोपर्यंत शासनाने कोलारा पशुवैद्यकीय दवाखान्यावर एखादा माणूस मदतीस द्यावा. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, नदी नाले भरून वाहत आहेत. त्यामुळे नदी नाल्यातून जाऊन जनावरावर उपचार करावे लागत आहेत. त्यामुळे या ठिकाणी मदतीस शासनाने एखादा माणूस द्यावा, अशी विनंतीही त्यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’मार्फत शासनाकडे केली आहे. सर्व शेतकर्यांनी जे बाधित जनावरे आहेत, ते वेगळे बांधून त्यांच्यावर योग्य तो उपचार करावा, व सर्व जनावरांना लसीकरण करून घेण्यात यावे, असे आवाहनही कोलरा पशुवैद्यकीय अधिकारी पूनम तायडे यांनी केले आहे.
—————-