BULDHANAChikhali

चालता चालता पोरगं विसरली, अन् पळवून नेल्याची आरोळी ठोकली!

– चिखली – मेहकर रस्त्यावर आज सकाळी घडला प्रकार
– मुलं पळविणार्‍या टोळीच्या अफवेने पुन्हा एकदा उडाली खळबळ

चिखली (एकनाथ माळेकर) – मेहकर – चिखली या मार्गाने शेतात दोन अपत्यांसह जाणार्‍या महिलेचा मागे मागे चालणारा तीन वर्षे वयाचा मुलगा अचानक रस्ता चुकून शेतात शिरला. पुढे चालणार्‍या त्या महिलेने मागे पाहिले असता, मुलगा दिसला नाही. तिने क्षणात मुलं पळविणार्‍या व दुचाकीवर आलेल्या लोकांनी पोरगा हिसकावून पळवून नेला, अशी आरोळी ठोकली. तिचा आक्रोश पाहाता जवळपास ५०० ते ६०० जणांचा जमाव जमला. या घटनेची खबर पोलिसांना मिळाली असता, साखरखेर्डाचे ठाणेदार जितेंद्र आडोळे हे स्वतः पोलिस पथकासह घटनास्थळी पोहोचले. तेवढ्यात लव्हाळ्याचे सरपंच दिनकर कंकाळ यांचे वडिल मधुकर बाजीराव कंकाळ हे त्या मुलाला घेऊन घटनास्थळी आले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. संबंधित महिलाच चालता चालता मुलगा विसरली आणि तिनेच पोरगा पळवून नेल्याची आरोळी ठोकली, ही बाब उघडकीस आली. परिसरात कोणतीही मुलं पळवणारी टोळी नसून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन ठाणेदार आडोळे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना केले आहे.

या घटनेबाबत माहिती देताना, ठाणेदार आडोळे म्हणाले, की आज सव्वादहा वाजेच्या दरम्यान पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस नाईक प्रवीण गवई यांना एक फोन आला की, लव्हाळा ते पिंपळगावउंडा गावाच्या दरम्यान मुख्य रस्त्याच्या बाजूला एका स्त्रीच्या हातातून तीन वर्षाच्या मुलाला दुचाकीवर आलेल्या दोन इसमांनी पळवून नेले आहे. सदर स्त्रीने रस्त्यावरील लोकांना थांबून हा प्रकार सांगितला. यामुळे त्या ठिकाणी खूप मोठी म्हणजे जवळजवळ ४०० ते ५०० लोकांची गर्दी जमा झाली आहे. मिळालेली माहिती धक्कादायक व गंभीर स्वरुपाची असल्याने याबाबत कर्मचार्‍यांनी आम्हाला माहिती देताच, स्टाफसह घटनास्थळावर गेलो. तेथे गेल्यावर असे कळले, की सदर स्त्री आपल्या दोन अपत्यांसह, एक मुलगा व एक मुलगी, मुलाचे वय तीन वर्षे यांच्यासह शेतात जात होती. स्त्री चिखली ते मेहकर या मुख्य रोडपासून आतमध्ये जात असलेल्या रस्त्याने पुढे चालत होती, तर तिची मुले तिच्या मागे चालत होती. काही वेळाने स्त्रीने जेव्हा मागे वळून बघितले तेव्हा तिच्या असे निदर्शनास आले की, आपल्या मागे आपला तीन वर्षाचा चिमुकला नाही. लगेच चिखली-मेहकर या रस्त्यावर येऊन माझ्या मुलाला दुचाकीवर येऊन दोन अज्ञात इसमानी पळवून नेले, अशी तिने आरोळी ठोकली. त्यामुळेच तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. हा प्रकार समजून घेईपर्यंतच लव्हाळा गावाचे सरपंच दिनकर कंकाळ यांचे वडील मधुकर बाजीराव कंकाळ हे त्या मुलाला घेऊन आपल्या दुचाकीने सदर गर्दीच्या ठिकाणी आले, व त्यांनी सांगितले की सदर मुलगा हा रस्ता चुकून माझ्या शेतात आला होता. मी गवत कापत होतो. हा मुलगा तिथे रडत होता. त्यामुळे त्या आरोळी ठोकणार्‍या महिलेला समजावून सांगत, तिच्या ताब्यात तिचा मुलगा दिला व या घटनेवर पडदा पडला. तोपर्यंत ही खबर चुकीच्या पद्धतीने कानोकानी पोहोचली होती. तेव्हा, परिसरात कोणतीही मुले पळवून नेणारी टोळी नसून, ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही ठाणेदार आडोळे यांनी केले आहे.


सद्या ग्रामीण भागात अफवांचे पेव फुटले असून, आजची घटनादेखील वेगळ्या व चुकीच्या प्रकारे त्या महिलेकडून सांगितल्या गेली. सदर मुलगा जर कोल्ह्या, लांडग्यासारख्या एखाद्या हिंस्र वन्यप्राण्याच्या तावडीत सापडला असता, तर उद्या अशी ही आरोळी उठली असती की या मुलाचे अवयव चोरट्यांनी काढून नेले आहेत, आणि त्या मुलाला इथे टाकून देण्यात आलेले आहे. तेव्हा, सर्व सुज्ञ नागरिकांना, आया-बहिणींना, माता-भगिनींना आपण विनंती करतो की, आपण आपल्या मुलांकडे योग्य लक्ष द्यावे, व खरा प्रकार काय आहे हे आपण प्रशासनाला सांगावे, जेणेकरून अफवा पसरणार नाहीत व लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होणार नाही, असे आवाहनही ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी केलेले आहे. तसेच, लोकांनी शहानिशा केल्याशिवाय कोणतेही व्हिडिओ व्हायरल करू नये व पोलीस स्टेशनला माहिती देणे आवश्यक आहे, असेही ठाणेदार आडोळे हे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना म्हणाले.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!