मेरा बुद्रूक, ता. चिखली (प्रतिनिधी) – अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या कार्यकारी परिषदेची कार्यकारणी गठित करण्यात आली. त्यामध्ये मनूबाई येथील चिखली श्री शिवाजी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. वायाळ यांची स्वीकृत सदस्य म्हणून दुसर्यांदा निवड करण्यात आली आहे.
अमरावती श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत प्रगती पॅनलचे प्रमुख तथा संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नवनियुक्त कार्यकारिणीची पहिली बैठक बुधवारी शिवाजी शिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. कार्यकारणीमध्ये मागील वर्षीचे चार स्वीकृत सदस्य पुन्हा कायम ठेवण्याचा निर्णय अध्यक्ष व संस्थेच्या कार्यकारी परिषदेने घेतला आहे. त्यामध्ये महाविद्यालयीन गटातून नागपूर येथील विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र पुंडलिकराव ढोरे, विद्यालय विभागातून द्विलक्षी अभ्यासक्रम श्री शिवाजी बहुद्देशीय उच्च माध्यमिक शाळेचे शिक्षक नरेशचंद्र एम. पाटील, बुलढाणा येथील श्री शिवाजी अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. वायाळ तर इतर संस्था गटातून ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. अमोल यांची निवड करण्यात आली.
दुसर्यांदा प्राचार्य डॉ. पी. एस. वायाळ यांची निवड झाल्याने गुंजाळा येथील सरपंच दीपक केदार, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्यावतीने मेरा बुद्रूक प्रतिनिधी प्रताप मोरे, तलाठी पी. टी. केदार यांनी वायाळ सर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.