Breaking newsCinemaHead linesWorld update

विनोदविराची अकाली एक्झिट; राजू श्रीवास्तव यांचे निधन

नवी दिल्ली (ब्रेकिंग महाराष्ट्र) – ‘गजोधर भैय्या’ म्हणून कलाजगतात लोकप्रिय असणार्‍या राजू श्रीवास्तव यांनी आज (दि.२१) जगाचा निरोप घेतला. कित्येक दिवसांपासून मृत्यूशी सुरु असणारी झुंज अखेर ते हरले आणि मनाला चटका लावत त्यांनी एक्झिट घेतल. संघर्षाच्या दिवसांतून पुढे आलेल्या श्रीवास्तव यांनी कायमच त्यांच्या मनाच्या श्रीमंतीने चाहत्यांची मने जिंकली. त्यांच्यात दडलेला सर्वसामान्य माणूस कायमच एका सेलिब्रिटीवर उजवा ठरत होता. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. १० ऑगस्ट रोजी सकाळी व्यायाम करत असताना ते ट्रेड मिलवर कोसळले. यावेळी त्यांना तत्काळ एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. एम्स रुग्णालयातील आयसीयू डिपार्टमेंटमधील व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया पार पडली होती. राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या (दि.२२) सकाळी साडेनऊ वाजता दिल्लीत अंत्यसस्कार करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

१९८९ मध्ये आलेल्या मैंने प्यार किया या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा काम केले. त्यानंतर ‘बाजीगर’, ‘बॉम्बे टु गोवा’ ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपया’ यासारख्या सिनेमांमध्ये ते झळकले. यानंतर राजू ‘बिग बॉस’च्या तिसर्‍या पर्वातही सहभागी झाले होते. ‘नच बलिए’ आणि ‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’ या कार्यक्रमामध्येदेखील त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या करिअरची सुरुवात स्टेज शोमधून झाली. २००५ ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमामधून ते प्रेक्षकांच्या भेटीस आले. या कार्यक्रमामधील त्यांच्या परफॉर्मन्सचे अनेकांनी कौतुक देखील केले. ‘द किंग ऑफ कॉमेडी’ असेही राजू श्रीवास्तव यांना बोलले जात होते. तसेच त्यांच्या ‘गजोधर भैय्या’ या भूमिकेलादेखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करताना, त्यांच्या कॉमिक टायमिंगला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर देखील ते अ‍ॅक्टिव्ह होते. राजू श्रीवास्तव यांची पत्नी शिखा श्रीवास्तव या गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीबाबत चाहत्यांना माहिती देत होत्या. परंतु, आज हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. राजू श्रीवास्तव यांना अनेक सेलिब्रिटींनी श्रद्धांजली अर्पण केली.

मेहनतीच्या बळावर नावारुपास आलेल्या या गुणी व नम्र कलाकाराने आज मुलगी आणि पत्नीसाठी कोट्यवधींची संपत्ती मागे ठेवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार श्रीवास्तव एका स्टेज शोसाठी जवळपास ४ ते ५ लाख रुपये इतके मानधन घेत होते. काही माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार त्यांचे वार्षिक उत्पन्न २० कोटी रुपये इतके होते. मुंबईसह कानपूरमध्ये श्रीवास्तव यांचे स्वत:चे घरही आहे.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!