चिखली (एकनाथ माळेकर) – गावठी कट्ट्याचा धाक दाखवून सिंदखेडराजा तालुक्यातील दरेगाव येथे ३ जुलैच्या मध्यरात्री दरोडा घालणार्या व सहा लाखाचा ऐवज लुबाडणार्या दरोडोखोरांच्या टोळीतील दोघा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात साखरखेर्डा पोलिसांना यश आले आहे. या दरोडेखोरांची ओळख पटली असून, त्यांची पोलिस कसून चौकशी करत आहेत. त्यांच्या चौकशीतून इतरही अनेक दरोडे उघडकीस येण्याची शक्यता आहे. दहिमल भोसले (वय ४५) व अजय भोसले (वय २४) अशा या दरोडेखोरांची नावे आहेत. हे दोघे दरोडेखोर बापलेक असून, ते लोणी (ता.मेहकर) येथील रहिवासी आहेत.
सिंदखेडराजा तालुक्यातील दरेगाव येथे ३ जुलै २०२२च्या मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांनी गावठी कट्ट्याच्या सहाय्याने गजानन सुरेश बंगाळे यांच्या घरी दरोडा घातला होता. दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर सहा लाखांचा ऐवज लुटला होता. त्यामध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याचा हार, कर्णफुले, सोन्याचे इत दागिणे यांचा समावेश होता. या प्रकरणी गजानन बंगाळे यांनी साखरखेर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. परंतु, तब्बल अडीच महिने झाले तरी दरोडेखोर पोलिसांना सापडत नव्हते. साखरखेर्डा पोलिसांची एक टीम आणि स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी)चे पथकदेखील या गुन्ह्याचा तपास करत होते. साखरखेर्डाचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांना या गुन्ह्याकामी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तपास पथकाला लोणी, ता. मेहकर येथे पाठवले. त्यानुसार, या दरोड्यातील आरोपींपैकी दहिमल बालाजी भोसले (वय ४५) व अजय दहिमल भोसले (वय २४) दोघेही बापलेक राहणार लोणी यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी सुरु होती. तथापि, फिर्यादी गजानन बंगाळे यांनी या दरोडेखोरांना ओळखले असून, या गुन्ह्यातील दरोडेखोर जेरबंद झाल्याने साखरखेर्डा पोलिसांचे अभिनंदन होत आहे. या दरोड्याप्रकरणी साखरखेर्डा पोलिसांत गुन्हा रजि. १९२/२०२२, भादविंच्या ३९५ कलमान्वये गुन्हा दाखल आहे. या दोन्हीही दरोडेखोरांची साखरखेर्डा पोलिस कसून चौकशी करत असून, त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करणे, त्यांनी इतरही काही गुन्हे केले आहेत का, याची माहिती घेण्याचे काम पोलिस करत आहेत.
—————