कोरोना गेला, मुला-मुलींनो अभ्यासाला लागा; दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर!
अमरावती (जिल्हा प्रतिनिधी) – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्पेâ घेण्यात येणार्या राज्य माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता दहावी) आणि उच्च माध्यमिक (इयत्ता बारावी) परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य बोर्डाकडून सोमवारी जाहीर करण्यात आले. संभाव्य वेळापत्रकानुसार, बोर्डाची दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च २०२३ दरम्यान होणार आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०२३ दरम्यान होणार आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे, यासाठी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
दहावीची लेखी परीक्षा २ मार्च ते २५ मार्च २०२३ या कालावधीत होणार आहे. तर १२ वीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०२३ या कालावधीत होणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली. हे संभाव्य वेळापत्रक असून निश्चित वेळापत्रकाबाबतची माहिती शाळांना दिली जाणार आहे. त्या सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षा घेतल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी अन्य कोणत्याही माध्यमातून आलेल्या तारखा, वेळापत्रके यावर विश्वास ठेऊ नये. फक्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांना पाठवलेले आणि राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेले वेळापत्रक ग्राह्य धरावे, असेही ओक यांनी सांगितले. वर्ष २०२२ या वर्षीत दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या लिखाणाचा सराव कमी झाल्यामुळे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना जास्त वेळदेखील देण्यात आला होता. यंदा मात्र, सर्व शाळा नियमीत सुरु झाल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधीत कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
——————