– जि.प.सदस्या डॉ. सौ. ज्योतीताई खेडेकर यांनी स्वखर्चाने दिल्या २५० लसी
चिखली (एकनाथ माळेकर) – अंत्री खेडेकर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात लम्पी आजाराने ग्रस्त जनावरे तपासणीसाठी आली असून, त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. एकूण चार जनावरांना लम्पी आजार झाल्याने, या भागातही लम्पी आजाराचा शिरकाव झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकरी व पशुपालकांनी आपल्या जनावरांची काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान, लम्पी आजारावरील लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने, चिखली तालुक्यातील गो-धन धोक्यात आले आहे. ही परिस्थिती पाहाता, जिल्हा परिषद सदस्या डॉ. सौ. ज्योतीताई खेडेकर यांनी स्वखर्चाने अडिचशे लसी शासकीय यंत्रणेला उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्याहस्ते सावरखेड बुद्रूक व खुर्द येथे लसीकरणास सुरुवातही करण्यात आली आहे. लसीकरणाचा गोरगरीब शेतकर्यांच्या जनावरांना फायदा होणार आहे.
राज्यभरात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, गो-धन धोक्यात आले आहे. चिखली तालुक्यातील जनावरेदेखील या रोगाचे ग्रस्त असल्याचे स्पष्ट झालेले आहे. परंतु, या रोगावरील लस उपलब्ध नसल्याने गो-धन दगावण्याचा धोका निर्माण झालेला आहे. तालुक्यातील ही परिस्थिती पाहाता, जिल्हा परिषद सदस्या डॉ. सौ. ज्योतीताई खेडेकर यांनी स्वखर्चाने लसी खरेदी करून त्या शासकीय यंत्रणेला उपलब्ध करून दिल्यात, व लसीकरण मोहीम सुरु केली आहे. ज्या जनावरांना लम्पी आजार झाला असेल त्यांनी तातडीने आपली जनावरे वेगळी बांधावीत व पशुवैद्यकीय दवाखान्यांत तपासणीला आणावी, असे आवाहन तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दांडगे यांनी केलेले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मोरे हे लसीकरणाचे काम करत आहेत.
दरम्यान, अंत्री खेडेकर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात चार लम्पीग्रस्त जनावरांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. या दवाखान्याला अंत्री खेडेकर, मेरा खुर्द, चंदनपूर, असोला, कवठळ ही गावे जोडलेली आहेत. यापैकी अंत्री खेडेकर येथील दोन, आसोला व कवठळ येथील प्रत्येकी एका जनावराला लम्पी आजार झाल्याचे निदान झालेले आहे. याबाबत, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता मोरे यांच्याशी ब्रेकिंग महाराष्ट्रने संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की अंत्री खेडेकर येथील दवाखान्यास आतापर्यंत एक हजार लस मिळाली होती. त्यापैकी अंत्री खेडेकर ३००, मेरा खुर्द २००, चंदनपूर २००, आसोला २०० आणि कवठळ १०० असे जनावरांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. प्रत्येक गावात जावून गोठ्यावर जात लसीकरण केले जात आहे. ज्या जनावरांना हा आजार दिसून येत असेल ती जनावरे तातडीने वेगळी करावीत. तसेच, गोठ्यामध्ये सकाळ व संध्याकाळी लिंबाच्या पानाचा धूर करावा. जी जनावरे गाभण आहे, त्यांचेही लसीकरण करण्यात यावे, असा सल्ला डॉ. मोरे यांनी दिलेला आहे.
कोरोनाप्रमाणे लोकांनी गो-धन वाचविण्यासाठी पुढे यावे – डॉ. सौ. खेडेकर
दरम्यान, स्वखर्चाने लसी उपलब्ध करून दिल्याबद्दल शेतकर्यांनी जिल्हा परिषद सदस्या डॉ. सौ. ज्योतीताई खेडेकर यांचे आभार मानले आहेत. याप्रसंगी त्या म्हणाल्या, की कोरोना काळात जशी आपण माणुसकी जपली. त्याप्रमाणे लोकांनी समोर येवून गो-धन वाचवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. बळीराजांप्रती मी माझे कर्तव्य करून, त्यांचे ऋण थोडेफार का होईना फेडण्याचा प्रयत्न केला आहे, असेही डॉ. सौ. ज्योतीताई खेडेकर यांनी सांगितले.
—————