– ढगफुटीच्या पावसाने शेतात तळे साचले, पिकांची नासाडी
चिखली (एकनाथ माळेकर) – शेळगाव आटोळ महसूल मंडळातील इसरूळ, मंगरूळ, शेळगाव आटोळ, मिसाळवाडी, डौलखेड या भागात आज पुन्हा एकदा ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसाने नदी, ओढ्यांना पूर आला असून, शेतातदेखील तळे साचले होते. या पावसाने पिके खरडून गेली असून, हाती आलेला शेतमाल उद््ध्वस्त झाल्याने शेतकर्यावर प्रचंड मोठे संकट कोसळले आहे. रोगराईतून मोठ्या मुश्कीलने वाचवलेले सोयाबीन पिक या पावसाने नेस्तानाभूत केले असून, हाता तोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून नेल्याने शेतकरीवर्ग खचून गेला आहे.
गेल्या तीन चार दिवसांपासून या परिसरात पाऊस सुरुच आहे. परंतु, कालपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला असून, आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास तर ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. या पावसाने नदीला पूर आला, तसेच शेतातील सखल भागात पाण्याचे तळे साचले. त्यामुळे सोयाबीन पिक झोपले असून, पिकाची पूर्णपणे नासाडी झाली आहे. या पावसाने होत्याचे नव्हते झाले असून, शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आधीच शेतमालाला भाव नाही, त्यात मोठ्या मुश्किलीने सोयाबीन पीक वाचवण्यात शेतकरी यशस्वी झाला होता. परंतु, आज दुपारी झालेल्या मुसळधार व ढगफुटीसदृश पावसाने या पिकाची नासाडी झाली आहे. शेतातील शेतमाल पावसाने खरडून गेला असून, शेतातील पाईपसुद्धा पावसाने उखडून नेले होते.
मंगरूळ गावाला दोन्ही बाजूने नद्या असल्याने, गावाला पुराचा धोका निर्माण झाला असून, या दोन्ही नद्यांना प्रचंड पाणी आलेले आहे. या शिवाय, शेळगाव आटोळ, मिसाळवाडी या गावाच्या नदीलादेखील पूर आला असून, पुन्हा एकदा मिसाळवाडी गावाचा संपर्क तुटण्याची भीती निर्माण झालेली आहे. नद्यांच्या क्षेत्रात अजूनही पाऊस सुरूच आहे. मिसाळवाडी, देऊळगावमही येथील खडकपूर्णा ही धरणे भरली असून, या धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याने महसूल विभाग, कृषी सहाय्यक यांनी तातडीने पंचनामे करून उद््ध्वस्त झालेल्या शेतकर्यांना सरकारने तातडीने मदत देण्याची गरज निर्माण झाली आहे. या मंडळातील सर्वच गावे नुकसानग्रस्त यादीत घ्यावी, अशी मागणी पीडित शेतकरी व ग्रामस्थ करत आहेत.
शेळगाव आटोळ परिसरातील गावांमध्ये आज दुपारी ढगफुटीसदृश पाऊस झाला असून, नद्या, ओढे-नाल्यांना पूर आला आहे. या पावसाने सोयाबीनसह सर्वच पिकांची अतोनात नासाडी झाली आहे. शेतमाल खरडून गेला असून, शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे. महसूल व कृषी यंत्रणेने तातडीने पंचनामे हाती घ्यावेत, पीकविमा कंपनीनेदेखील तातडीने पंचनामे करावेत, आणि लवकरात लवकर शासकीय मदत मिळावी, अशी शेतकरीवर्गाची मागणी आहे.
– डॉ. विकास मिसाळ, तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, सरपंच शेळगाव आटोळ
शेतकर्यांनी तातडीने तक्रार दाखल करावी – तालुका कृषी अधिकारी
ज्या शेतकर्यांनी पीकविमा काढलेला आहे, त्या शेतकर्यांनी आपल्या शेतपिकांच्या नुकसानीची तक्रार पोर्टलवर शक्य तितक्या लवकर नोंद करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांनी केलेले आहे. तालुक्यातील शेतीपिकांच्या नुकसानीबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने त्यांच्याशी संपर्क साधून सर्व परिस्थितीची त्यांना माहिती दिली आहे. या शिवाय, ज्या शेतकर्यांचे नुकसान झाले आहे, तसेच ज्यांनी ऑनलाईन तक्रारही दाखल केलेली आहे, त्या सर्व शेतकर्यांचे चिखली तालुक्यात सर्वेक्षण सुरु झालेले आहे, अशी माहिती पीकविमा कंपनीने दिली आहे.