चिखली (एकनाथ माळेकर) – तब्बल १० वर्षे कारावास होऊ शकेल, अशा भारतीय दंडविधानाच्या ३६३ व ३६६ (विषारी द्रव्य पाजणे, गंभीर दुखापत करणे, बळजबरी करणे, हत्येचा प्रयत्न करणे) या कलमानुसार दाखल गुन्ह्यातील तब्बल सात वर्षे फरार असलेला आरोपी बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केला आहे. नवनीत घनश्याम गुजर (वय ३२) असे या आरोपीने नाव असून, तो मेरा खुर्दू येथील रहिवासी होता. गेली सात वर्षे तो पोलिसांना चकमा देत होता. परंतु, एलसीबीच्या पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
नवनीत गुजर हा आज बुलढाणा येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश लोधी यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक लेकुरवाळे, पोना जगदेव टेकाळे, चापोका रवी भिसे यांना सोबत घेऊन आरोपी नवनीत घनश्याम गुजर याच्यावर पाळत ठेवत सापळा लावला. त्यानुसार गुजर हा अलगद सापळ्यात अडकला. त्याला बुलढाणा बसस्टॅण्ड येथे अटक करण्यात आली आहे. या आरोपीवर अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत अपराध क्रमांक ०८/२०१५ कलम ३६३,३६६ नुसार गुन्हा दाखल आहे. या आरोपीला अटक केली असता, त्याने मला दोन लेकर आहेत अशी कबुली दिली आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून अंढेरा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. अधिक तपास अंढेरा पोलिस करत आहेत.
—————